जीवन कौशल्यांच्या पूलावरुनी…

मुलांच्या विविधांगी कौशल्यांबाबत मी इथे विचार विनिमय करणार आहे. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्नांचा पक्षी उंच भरारी घेत असेल, की नेमकी जीवन कौशल्ये म्हणजे काय व ती कोणती? त्यांचे महत्त्व काय बरे असेल?, जीवन कौशल्ये म्हणजे इंद्रधनुष्यातले ते सात रंग, ज्यांच्यापासून इंद्रधनुष्याची निर्मिती होते. हे सप्तरंग आपल्या असीम ओंजळीतून, मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अमृततूल्य स्वभावगुण मानवाकडे सुपूर्त करतात.

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
05th August 2022, 10:39 pm
जीवन कौशल्यांच्या पूलावरुनी…

सुयोग्य निर्णय घेण्याचे कौशल्य 

आपल्या चमत्कारी लेखणीत परमेश्वर आपल्या जीवनग्रंथांची रचनाच अशा पध्दतीने करतात की, पावलोपावली बालवयाच्या टप्प्यातसुध्दा अनेक प्रसंगांचे बाळकडू मुलांना मिळते. त्याच विविधांगी प्रसंगात योग्य निर्णय कसे घ्यावेत ह्याचे प्रशिक्षण बालवयातच देणे गरजेचे आहे. योग्य निर्णय घेण्याची सवय बालवयातच मुलांना झाली तर भविष्यात मुले स्वत:चे निर्णय स्वत: घेतील. प्रशिक्षणाची सुरुवात करत असताना छोट्या छोट्या निर्णयावरुन आपण सुरुवात करु शकतो. उदा. मातापिता आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे, खेळणी, निवडण्यास सांगू शकतात. तसेच त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ त्यांना विचारु शकतात.

संवादाचे कौशल्य

एक माणूस कधीही एकटा, एकांतात कुणाशीही न बोलता राहू शकत नाही. कारण वयाचा कुठलाही टप्पा का असेना, पण आपले आचारविचार, भावना, प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी इतरांशी निरंतर संवाद साधणे महत्त्वाचे असते. पालकांनीही आपल्या पाल्याला योग्य वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना आपल्याशी बोलण्यास प्रवृत्त केले पाहिजे व इतरांशी बोलण्याची, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांच्या सतत संपर्कात राहण्याची प्रेरणा दिली पाहिजे. त्यांना योग्य मुलांशी मैत्री करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. तरच भविष्यात मुले बोलकी बनतील. लहानपणापासूनच त्यांना बोलके केले तर त्यांचे पाय कधीही एकांताच्या दिशेने वळणार नाहीत. आपल्या समाजात होत असलेल्या अनेक कार्यक्रमात इतरांसोबत ते सहभागी होतील व त्यांचा सामाजिक विकास होईल.

आत्मनियंत्रण अन् एकाग्रतेचे कौशल्य

स्वत:ला नियंत्रित कसे करावे ह्याबाबत मातापित्यांनी बालपणापासूनच मुलांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. बालटप्प्यावर प्रत्येक मुलाची स्वत:ची अशी एक वेगळी वागणूक असते, सवयी असतात, ज्यांची मर्यादा ही असतेच. व त्याच मर्यादेबाबत मुलांना माहीत असणे गरजेचे आहे. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे ह्याची जाणीव प्रत्येकालाच त्याच्या बौध्दीक क्षमतेप्रमाणे असावी. मुले नेहमीच मातापित्यांचे, अन् इतर वरिष्ठांचे अनुकरण करतात, त्यांचा मेंदू गतीने विकसित होतो, ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लगेच त्यांच्या लक्षात येतात. मातापित्याने जर आपल्या वागणूकीवर ध्यान केंद्रित केले, तर मुले आपले अनुकरण नक्कीच करतील. आपण जर मुलांसमोर घरातल्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर नक्कीच उद्या मुले सुध्दा, न सांगता आपले घर स्वच्छ ठेवतील व आपल्या सर्व वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करतील, ज्यामुळे त्यांना शिस्तीत वागायची सवय होईल.

सकारात्मक दृष्टिकोण

मुलांच्या विचारांचा प्रवाह नेहमीच सकारात्मकतेच्या दिशेनेच असावा. त्यांच्या हृद्यात नकारात्मकता येता कामा नये हा मुख्य मुद्दा मातापित्याने सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे जीवनात सकाळ अन् रात्र दोन्हीही असतात, त्याचप्रमाणे जिथे यश असते तिथे काही प्रमाणात अपयश सुध्दा असतेच. आणि हाच तो अपयशाचा क्षण असतो, जेव्हा मुलांमध्ये नकारात्मकतेचे मूळ तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपयशात खचून न जाता, त्याला एक शिकवण मानून पुन्हा नव्याने कसे तटस्थ उभे रहावे ह्याबाबत मुलांना मातापित्याने मार्गदर्शन केले पाहिजे. अपयशाकडे सुध्दा सकारात्मकतेने पहाण्याची दृष्टी त्यांना आपण दिली पाहिजे, म्हणजेच मुले स्वत:हून जीवनातली आव्हाने स्विकारतील, जिद्दीने लढतील व निश्चित केलेल्या ध्येयाच्या दिशेने आपोआपच त्यांची पाऊले वाटचाल करत राहतील.

समस्या निवारणाचे कौशल्य

आपले जीवन म्हणजे आव्हानांनी परिपूर्ण गाठोडेच जणू, ज्यातून अनेक समस्या बाहेर निघतात. अन् त्याचे समाधान करण्याच्या दृष्टीने, समक्ष असलेल्या अनेक विचारांचे मूल्यमापन करुन, त्याचे योग्य निवारण शोधणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे सगळ्यात आधी मातापित्याने, मुलांना जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचे योग्य मूल्यमापन करण्याचे, व कुठल्याही प्रसंगाची सकारात्मक अन् नकारात्मक बाजू नीट पडताळून, मगच योग्य निर्णय घेण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात आधी कोणत्याही घटनेचे गांभीर्य मुलांनी समजून घ्यायला हवे. तसेच आपल्या घरात जिथे शक्य असेल तिथे आपल्या भावना व आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले पाहिजे.

मुद्देसूद विचारसरणी

कुठल्याही तथ्यहीन मुद्द्याला, बळी न पडता, नेहमीच मुद्देसूद विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना, वा कुठल्याही विचारावर आधारित प्रत्यक्ष कार्य करताना मुलांनी सारासार हा विचार केलाच पाहिजे की आपण केलेली क्रिया, ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने मदतकारक सिध्द होईल की नाही. जर त्यात काही अडचणींचा आभास झालाच तर इतर मुद्द्यांवर विचार करावा. त्यामुळे मातापित्याने मुलांना नवनवीन प्रसंगात त्यांना निर्णय घेण्याकरीता वेगवेगळ्या युक्ती शोधून काढण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

स्वरक्षण

स्वरक्षणाच्या बाबतीत बोलताना ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ह्या पोलीस खात्यातल्या प्रभावी मंत्राचे स्मरण होते. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे चांगल्या गोष्टींचे स्वागत करुन वाईटाचा नाश करणे होय. आत्ताच्या वर्तमान काळात गुन्हे अत्याचार गतीने आपले डोके वर काढत आहे. अशा परिस्थितीत आपल्यावर जर कोणताही अन्याय झाला, तर कुणी आपल्याला वाचवायला येईल का, ह्या आशेवर राहून उशीर होण्यापेक्षा प्रत्येक मुलाने स्वत:चे संरक्षण स्वत: केले पाहिजे व आपल्या अभ्यासक्रमात आजकाल असे अनेक विषय, सामावलेले आहेत. जर ह्या सप्तरंगी मुद्द्यांना आपण प्रत्यक्षात आचरणात आणले तर नक्कीच आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास लहान वयातच होईल. नक्की विचार करा.