मासिक पाळी आणि किशोरवयातील बदल

बालपणातून अलगद तारुण्याकडे नेणारे वय म्हणजे किशोर वय. साधारण वयाच्या दहा-बाराव्या वर्षी मुलींच्या शरीरात होणा-या इतर बदलांपैकी मासिक पाळीचे सुरू होणे हा एक महत्त्वपूर्ण बदल. मासिक पाळी किंवा ऋतुस्राव ही श्वास घेण्याइतकीच नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
05th August 2022, 10:35 Hrs
मासिक पाळी आणि किशोरवयातील बदल

ऋतुजाची आई सकाळपासून तिच्यावर ओरडत होती. इथे जाऊ नको.. तिथे शिवू नको. ऋतुजाही आज अगदी वेगळीच वागत होती. मध्येच चीडत होती, मध्येच रडत होती.. कसा-बसा तिचा अबोला सोडविल्यानंतर शेवटी ती म्हणाली.. ताई मला पीरियड्स चालू झाले, आजपासून मी मोठी झाली. म्हणजे आता खेळायचा फिरायचं सगळं बंद का गं?? आणि तिचं हे ऐकून माझ्या मनात वेगळीच विचार प्रक्रिया चालू झाली.

आपण शास्त्रीय कारण नसतानाही परंपरेने जखडून ठेवलेल्या व धार्मिक आधारावर चालत आलेल्या रिती रूढींना शास्त्रीय विचारसरणीवर पडताळून त्यात बदल आणत आहोतच. तरीही शाळेशाळेत व सामाजिक स्तरावर मासिक पाळी बाबत जागरूकता आणण्याचा कितीही प्रयत्न चालू असला तरी अजून समाजातला न्यूनगंड पूर्णपणे दूर जाण्यास किती वर्षे लागतील याचा काही अंदाज नाही. गप्प-चीळी राहिले तर चार शब्दात संपणारा, नी बोलत गेले तर अविरत अशा मासिक पाळी विषयावर आज आपण थोडंफार  बोलूया.

 बालपणातून अलगद तारुण्याकडे नेणारे वय म्हणजे किशोर वय. साधारण वयाच्या दहा- बाराव्या वर्षी मुलींच्या शरीरात होणा-या इतर बदलांपैकी मासिक पाळीचे सुरू होणे हा एक महत्त्वपूर्ण बदल. मासिक पाळी किंवा ऋतुस्राव ही श्वास घेण्याइतकीच नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात मुलगी किशोर वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास रक्तस्राव होतो.

मासिक पाळीत नेमके काय होते ?

मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज (एग) ओवरीमधून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. प्रत्येक महिन्यात ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही तेव्हा फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो. मासिक पाळी दर २८ दिवसांनी येते पण काही जणांना मागेपुढे असा फरक पडू शकतो. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर किशोर वयात अनियमितपणे येऊन मग हळूहळू नियमित होत जाते. मुलीला १६ वर्षांपर्यंत जर पाळी आली नाही तर डॉक्टरांना दाखवून घ्या. अशक्त असेल तर तिच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे.

मासिक पाळीतील त्रास

पाळी आल्यावर २ ते ६ दिवस रक्तस्त्राव होऊ शकतो. सुरुवातीस त्यात थोडा अनियमितपणा व रक्तस्त्रावह कमी जास्त प्रमाणात जाऊ शकते. मासिक पाळी आल्यावर किंवा येण्यापूर्वी थोडे फार पोट दुखणे, मळमळणे, उलटी येणे, झोप न लागणे, कंबर दुखणे, डोके दुखणे, अंग दुखणे असा त्रास होऊ शकतो. हा त्रास तात्पुरता असून व शरीर प्रक्रियेत बदल झाल्याने होत असतो. पाळी दरम्यान अनियमितता, पोटदुखी व जास्त रक्तस्त्राव होत असल्यास गर्भाशय, ओवरी किंवा गर्भनलिकेची सूज, पीसीओडी, हॉर्मोनल नियमन बिघडणे किंवा रक्तघटकांची कमतरता हे त्रास असण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. त्रासामुळे कितीतरी मुलींना शाळा कॉलेजमधून वारंवार रजा घ्यावी लागते ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते. मासिक पाळीत पूर्ण विश्रांतीची गरज नसली तरी, अतिकष्टाची कामे टाळावी, भरपूर पाणी, फळे व पचण्यास हलका असा आहार घ्यावा.

मासिक पाळीतील स्वच्छता

पाळीच्या काळात रोज नियमितपणे आंघोळ करून आपला खासगी भाग स्वच्छ ठेवावा. आधीच्या काळात किंवा गावागावात अजूनही बायका कपड्याच्या घड्या वापरतात. त्या सुती कापडाच्या, पातळ आणि मऊ असाव्यात. कापड वापरत असल्यास ते निर्जंतुक घालून स्वच्छ धुवावे. बाजारात सोयीस्करपणे मिळणारे सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पून वापरणे जास्त सोपे पडते. अस्वच्छ कपडा किंवा पॅड जास्त वेळ वापरल्यास जंतू संसर्ग होणे, खाज सुटणे ह्या समस्यांची शक्यता असते. त्यामुळे Menstrual कप वापरण्यावर जास्त भर दिला जात आहे. एक कपचा वापर किमान पाच वर्षांपर्यंत होऊ शकतो व कचरा निर्मिती कमी होऊन नैसर्गिक हानी कमी होते. पाळीदरम्यान स्वच्छता पाळल्यास योनीमार्ग, मूत्रमार्गातील संसर्ग, यीस्ट संसर्ग आणि गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या समस्या टाळल्या जाऊ शकतात. शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी सत्राचे उपक्रम राबवले जातात. ज्यामध्ये सॅनेटरी नॅपकिन कसे वापरावे, पाळी कशी येते अशी माहिती दिली जाते. एकूण हा बदल सामान्य असून त्यामुळे आपण कोमेजून न जाता आपले हे वय खुलून जगले पहिजे.

किशोर वयात मासिक पाळीसारख्या शारीरिक बदला सोबत अनेक मानसिक बदलही होत असतात. मुलामुलींनी त्याबाबत मनात गैरसमज न ठेवता त्याविषयी घरात किंवा शाळेत सविस्तर चर्चा करणं आवश्यक आहे. चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी काय आहार खावा, मासिक पाळीच्यावेळी घरगुती उपाय काय असू शकतात हेही सांगितला गेलं पाहिजे. इन्स्टाग्राम, फेसबूक माध्यमांद्वारे देखील खूप जणं सामाजिक व्यवस्थेमुळे उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या ‘Menstrual taboos and hygiene’ बद्दल जनजागृतीचे काम करतात. चला तर आपणही  शरीरात होणा-या किशोरवयातील या नैसर्गिक बदलांबद्दल खुलेपणाने बोलण्याचा प्रयत्न करुयात.