विक्रांत रोनाला प्रेक्षकांची पसंती; ‘एक व्हिलन’कडे पाठ


04th August 2022, 08:40 pm
विक्रांत रोनाला प्रेक्षकांची पसंती; ‘एक व्हिलन’कडे पाठ

सध्या बॉलीवूडचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. अशा परिस्थितीत कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट चालेल की नाही, असा प्रश्न पडतो. 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'विक्रांत रोना' गेल्या शुक्रवारी रिलीज झाले. ज्यात 'विक्रांत रोना' ‘एक व्हिलन’च्या तुलनेत चांगली कमाई करत आहे. त्याचबरोबर 'एक व्हिलन रिटर्न्स' हा मल्टीस्टारर चित्रपट फ्लॉप ठरताना दिसत आहे.
अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम सारखी मोठी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही. दुसरीकडे, शमशेरा या वर्षातील सर्वात मोठ्या ‘डिझास्टर’च्या श्रेणीत गेला आहे. त्याच वेळी मृणाल ठाकूरचा पॅन इंडिया चित्रपट 'सीता रामम' शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.
एक व्हिलन रिटर्न्स
एक व्हिलन रिटर्न्स हा मल्टीस्टारर चित्रपट सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'एक व्हिलन'मध्ये रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर मोहित सूरीने 'एक व्हिलन रिटर्न्स'चा आणला. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली होती, मात्र आता त्याचा आलेख झपाट्याने घसरताना दिसत आहे. बुधवारी या चित्रपटाने केवळ २.४० कोटींचा व्यवसाय केला आहे. आता एक व्हिलन रिटर्न्सचे एकूण कलेक्शन ३१.८० कोटी रुपये झाले आहे.
विक्रांत रोना
कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपचा पॅन इंडिया पहिला चित्रपट 'विक्रांत रोना' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले असून अद्यापही याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आता हे पाहणे मनोरंजक असेल की हा चित्रपट पहिल्या आठवड्यात ७० कोटींची कमाई करू शकतो की नाही कारण तो या आकड्यापासून थोडासाच दूर आहे.
मंगळवारी चांगला व्यवसाय
किच्चा सुदीपची मुख्य भूमिका असलेल्या 'विक्रांत रोना'ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी एकूण ३.५३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामध्ये कन्नड भाषेत २.०५ कोटी रुपये, तेलुगूमध्ये ५६ लाख रुपये, हिंदीमध्ये ६९ लाख रुपये आणि तामिळमध्ये २३ लाख रुपये समाविष्ट आहेत. अशाप्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ६१.२३ कोटींचा व्यवसाय केला आहे.
अजूनही आहे आशा
चित्रपटाकडून अधिक कमाईची अपेक्षा केली जाऊ शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्पर्धा करण्यासाठी कोणतेही मोठे चित्रपट नाहीत. हिंदी चित्रपटांचा विचार केला तर 'शमशेरा'नंतर 'एक व्हिलन रिटर्न्स'नेही बॉक्स ऑफिसवर मान टाकली आहे. अशा परिस्थितीत, प्रेक्षक थिएटरमध्ये विक्रांत रोनाकडे वळू शकतात. दुसरीकडे, कन्नडमध्ये चित्रपट सध्या चांगली कमाई करत आहे.
रामाराव ऑन ड्युटी
साऊथ सुपरस्टार रवी तेजा निर्मित रामाराव ऑन ड्यूटी हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपटही या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची कमाई सुरुवातीपासूनच खूपच कमी आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, रामाराव ऑन ड्युटी चित्रपटाने सहाव्या दिवशी केवळ २० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.