विक्रांतसह १६ जणांकडून जमिनी लाटण्याचा सपाटा

राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सुमारे ७० मालमत्ता आपल्यासह १६ जणांच्या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून लुटल्याचा आणि या मालमत्ता आपले मित्र तसेच आई-वडिलांच्या नावे केल्याचा खळबळजनक खुलासा आसगाव-बार्देशमधील जमीन प्रकरणात अटक केलेल्या आणि शुक्रवारी जामिनावर सुटका झालेल्या विक्रांत शेट्टीने ‘एसआयटी’समोर केला आहे.

Story: गोवन वार्ता / उमेश झर्मेकर |
25th June 2022, 12:43 am
विक्रांतसह १६ जणांकडून जमिनी लाटण्याचा सपाटा

म्हापसा : राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सुमारे ७० मालमत्ता आपल्यासह १६ जणांच्या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून लुटल्याचा आणि या मालमत्ता आपले मित्र तसेच आई-वडिलांच्या नावे केल्याचा खळबळजनक खुलासा आसगाव-बार्देशमधील जमीन प्रकरणात अटक केलेल्या आणि शुक्रवारी जामिनावर सुटका झालेल्या विक्रांत शेट्टीने ‘एसआयटी’समोर केला आहे.   

विक्रांत शेट्टीच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान सरकारी वकील अॅड. सुकृती चोडणकर यांनी यासंदर्भातील माहिती न्यायालयास दिली. राज्यभरातील कोट्यवधी रुपये किमतीच्या १.४८ लाख चौरस मीटरच्या ७० मालमत्ता आपण मोहम्मद सुहैल, राजू मैत्री, सुनील कुमार व इतर बारा सहकाऱ्यांसह बोगस दस्तावेजांद्वारे बळकावल्या. 

मूळ मालकांच्या मालमत्ता हडप करून त्या आपण परस्पर आपले मित्र आणि आई-वडिलांच्या नावावर केल्या व त्यानंतर त्यांची विक्री केल्याचे शेट्टीने जबानीत सांगितले आहे. या मालमत्तांचे बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी आम्ही पुरातत्त्व संचालनालय तसेच उपनिबंधक कार्यालयातून मूळ कागदपत्रे मिळवल्याचे व त्याजागी बनावट कागदपत्रे जोडून घेतल्याचेही शेट्टीने कबूल केल्याचे अॅड. सुकृती चोडणकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.  शेट्टीच्या टोळीने पुरातत्त्व व उपनिबंधक कार्यालयात घुसखोरी करून जमीन घोटाळा केला आहे. त्यात अनेकांच्या मालमत्ता लुटल्या गेल्या आहेत. त्यामुळे संशयित शेट्टी व त्याच्या इतर साथीदारांची ओळख पटविण्यासाठी शेट्टीला पोलीस कोठडीची गरज आहे. शिवाय, यासाठी वापरले गेलेले बनावट रबर स्टॅम्प, शाई, स्टॅम्प पेपर व इतर साहित्य अद्याप जप्त करायचे असून संशयिताच्या  इतर साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो साक्षीदारांना धमकी देऊन पुरावेही नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणीही अॅड. चोडणकर यांनी केली होती​.   दुसऱ्या बाजूला, शेट्टीचे वकील अॅड. रितेश रावळ यांनी युक्तिवाद करताना आपल्या आशिलाला अटक करण्यापूर्वी बेकायदेशीररीत्या ४५ तास कोंडून ठेवण्यात आले. त्याच्या तक्रारीच्या आधारेच मोहम्मद सुहैल याला अटक करण्यात आली. आपला अशील पोलीस चौकशीला सहकार्य करत असून पुढेही करेल. ‘एसआयटी’ने ही गोष्ट न्यायालयात मान्य केलेली असतानाही आपल्या अशीलाला पोलीस कोठडीत ठेवणे चुकीचे ठरेल. ‘२ जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्यात सर्वोेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार आपल्या अशीलाची मुक्तता करावी अशी मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेऊन न्यायालयात शेट्टी याची सशर्त जामिनावर सुटका केली.       

सुनील विदेशात पलायन करण्याची शक्यता     

विक्रांत शेट्टी याच्या टोळीतील सुनील कुमार हा विदेशात जाण्याची शक्यता आहे. ‘एसआयटी’ने देशातील सर्व विमानतळांना तशा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात ‘एसआयटी’ने ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडे पत्रव्यवहारही केला आहे. तसेच राजू मैत्रीच्या पासपोर्टबाबत माहिती मागवली आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.            

आसगाव जमीनप्रकरणी ‘एसआयटी’चा दावा     
सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि इतरांच्या सहाय्याने गुन्हेगारी कट रचत विक्रांत शेट्टी याने आसगाव-बार्देशमधील सर्व्हे क्रमांक ३३/३ मधील भूखंडाचे बेकायदा विक्रीपत्र (सेल डीड- १२-६-१९४३) तयार केले. ही मालमत्ता फिर्यादींच्या ताब्यात आहे.             
फिर्यादीने ही जमीन कधीच विकलेली नाही. शेट्टीने याच मालमत्तेचे व्ही. एस. श्रीकांत (बंगळुरु), अलोक गुप्ता (दिल्ली) व जयंतलाल चंद्रशेखर (बंगळुरू) यांच्या नावे १४ जुलै २०२१ रोजी विक्रीपत्र केले. बनावट दस्तावेजाच्या आधारे शेट्टीने ही मालमत्ता १.१२ कोटींना विकली.             
शेट्टी टोळीचा असा चालायचा कारभार  
- सरकारी संकेतस्थळावरून मालमत्ता व मालकांची ओळख पटवायचा.             
- त्यांच्या मालमत्ता बनावट दस्तावेजांद्वारे स्वत:चे मित्र आणि आई-वडिलांच्या नावे करायचा.             
- पुरातत्त्व खाते आणि उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट दस्तावेजांचा समावेश कागदपत्रांच्या मूळ खंडांत करायचा व तेथून मूळ कागदपत्रे मिळवून संबंधित मालमत्ता खरेदीदारांना विकायचा.             
- शेट्टी आणि त्याची टोळी व्यावसायिक पद्धतीने हे काम करत होती. यासाठी बनावट पोर्तुगीज कागदपत्रांचाही वापर होत होता.      
- शेट्टीच्या नावे आसगाव, हणजुणे, वागातोर आणि कळंगुट येथे आठ मालमत्ता आहेत. याची विक्रीपत्रे जप्त करण्याची आवश्यकता आहे.        
हेही वाचा