सांजाव उत्सवावेळी विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू


25th June 2022, 12:42 am
सांजाव उत्सवावेळी विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : नावेली डोंगरी येथे सांजाव उत्सवावेळी विहिरीत बुडाल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घडना शुक्रवारी घडली. सांजाव साजरा करत असताना डोंगरीतील आशिष नॉबर्ट रॉड्रिग्ज या युवकाने विहिरीत उडी मारली. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेलीत शुक्रवारी सांजाव उत्सव साजरा केला जात होता. डोंगरी नावेली याठिकाणी नागरिक जमून सांजावच्या निमित्ताने विहिरीत उड्या मारत होते. यावेळी आशिष रॉड्रिग्ज या युवकानेही विहिरीत उडी मारली. मात्र, विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने आशिषला पुन्हा वर येणे जमले नाही. आशिष पाण्यात बुडण्याची घटना सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आशिष पाण्यात गेल्याचे कळताच सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली पण विहीर खोल असल्याने आशिषला वर काढण्यासाठी प्रयत्न करुनही फायदा झाला नाही.आशिष याने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता व जहाजावर कामावर जाण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. आशिषच्या मृत्यूने नावेलीत सांजावच्या उत्साहावर विरजण पसरले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी नोंद केलेली असून पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा