विवाह रद्दबातल कायदा

आजार लपवून, नोकरीबद्दल, पगाराबद्दल खोटे सांगून लग्नं झाल्याची कमतरता नाही. बहुतेकदा सत्य समजेपर्यंत वेळ निघून जाते आणि जेव्हा समजते तेव्हा भावनिक स्तरावर स्वतःला सावरण्यात स्वतःचीच इतकी गुंतागुंत होते की लग्नाचे काय करावे समजत नाही.

Story: समुपदेशन | अॅड. पूजा नाईक गांवकर |
24th June 2022, 10:12 Hrs
विवाह रद्दबातल कायदा

माझे एका मुलीशी तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. परंतु लग्नाच्या आधी मुलीने आणि तिच्या आई-वडिलांनी तिला आजार असल्याचे लपवले. लग्न होऊन ती सासरी राहायला आल्यावर असे लक्षात आले, की तिला बऱ्याच वस्तू दिसत नाहीत. तिला विचारल्यावर तिने चष्मा असल्याचे सांगितले पण तो लावायला आवडत नाही म्हणून दिसत नाही असे म्हणाली. मग तिला चष्मा रोज लावायला सांगितला. तरीही तिला रात्रीचे कमी दिसते हे आमच्या लक्षात आले. ती काहीतरी लपवते आहे ह्याची खात्री पटली म्हणून तिला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेले. तिला तपासल्यावर डॉक्टरांनी तिला ‘रेटिना पिगमेंटोसिस’ हा अनुवंशिक आजार असल्याचे सांगितले. मुला-बाळाचा विचार करू नका, कारण हा अनुवंशिक आणि बरा न होणारा आजार असल्याने बाळाला होण्याची शक्यता आहे, असेही डॉक्टर म्हणाले. सध्या माझ्या बायकोची ६०% दृष्टी गेली आहे. हळूहळू ती पूर्णपणे दृष्टिहीन होईल. अशा परिस्थितीत मी घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो का?”

अशा प्रकारे आजार लपवून, नोकरीबद्दल, पगाराबद्दल खोटे सांगून लग्नं झाल्याची कमतरता नाही. बहुतेकदा सत्य समजेपर्यंत वेळ निघून जाते आणि जेव्हा समजते तेव्हा भावनिक स्तरावर स्वतःला सावरण्यात स्वतःचीच इतकी गुंतागुंत होते की लग्नाचे काय करावे समजत नाही. 

विवाह रद्दबातल ठरवणे आणि घटस्फोट या दोन्हीत तत्वतः भरपूर फरक असला, तरीही दोन्ही बाबतीत लग्न झाल्याचे मान्य केले जाते आणि न्यायालयीन आदेशानुसार विवाहसंबंध संपुष्टात येतात. घटस्फोटासाठी अर्ज करताना जी कारणे कायद्यात नमूद केलेली आहेत, केवळ त्याच कारणांच्या आधारे घटस्फोट होऊ शकतो. पण त्या कारणांमध्ये फसवणूक करून झालेल्या लग्नांविषयी तरतूद नसल्याने विवाह रद्दबातल कायद्याचा आधार घ्यावा लागतो. लपवा छपवी करून, फसवून केलेल्या लग्नांना घटस्फोटा ऐवजी विवाह रद्दबातल (null and void) ठरवले जाते. म्हणजेच, प्रत्यक्षात विवाह झालेला असला तरी विवाह खोटा आणि गैर असल्याचे न्यायालय स्पष्ट करते.

विवाह रद्दबातल करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी काही विशिष्ट कारणे लग्नाच्या वेळी असावी लागतात. 

१. पहिला विवाह कायदेशीररित्या अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे. (मुस्लिम विवाह सोडून)

२. प्रतिबंधित नात्यांमध्ये विवाह होणे. (उदा: बहीण, काका, मामा इ.)

३. लग्नाच्या वेळी रजिस्ट्रार समोर खोटी माहिती देणे. 

४. दबाव किंवा फसवणूक करून लग्न करणे. 

५. नपुंसकत्व.

६. लग्नापूर्वीपासून आणि लग्नाच्या वेळी असलेले मानसिक असंतुलन 

७. वधू लग्नाच्या वेळी दुसऱ्या कोणापासून गरोदर असणे. 

वर नमूद केलेल्या कारणांच्या आधारे विवाह रद्दबातल ठरवला जाऊ शकतो. पण यासाठी लग्न झाल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. लग्नाला एक वर्ष उलटून गेले तर विवाह रद्दबातल कायद्यांतर्गत कोणतेही पाऊल उचलता येत नाही. त्याचबरोबर आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर स्वेच्छेने जोडीदाराशी वैवाहिक संबंध पूर्णपणे थांबलेले असणे आवश्यक आहे. फसवणूक झाल्याचे कळल्यावरही जर जोडीदाराशी सामान्य वैवाहिक संबंध चालू ठेवले, तर त्याचा अर्थ चूक माफ करून असलेल्या परिस्थितीसह जबाबदारी स्वीकारली आहे, असा होतो. अशा परिस्थितीत लग्न रद्द करण्याचा अर्ज न्यायालय नाकारू शकते. 

या कारणांचे स्वरूप गंभीर असल्याने केस सिद्ध करण्यासाठी तितक्याच ताकदीच्या पुराव्यांचा पाठिंबा लागतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. फसवणूक सिद्ध करणे वाटते तितके सोपे नाही. फसवणूक करण्यासाठी आधी स्वतःला ती गोष्ट माहीत असायला हवी, तरच ती खोटी किंवा चुकीची सांगून दुसऱ्याला फसवणे शक्य होते. काहीतरी आजार आहे हे लग्नानंतर समजले, तर ती फसवणूक ठरत नाही, ह्याची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या दाव्यात फसवणूक सिद्ध करताना ती गोष्ट लग्नाअगोदर दुसऱ्या पक्षास माहीत होती आणि तरीही त्यांनी ती मुद्दाम लपवली/बदलून सांगितली/खोटी सांगितली हे न्यायालयात मांडावे लागते आणि सिद्ध करावे लागते. ह्यासाठी वैद्यकीय चाचणींच्या वेळी केलेले रिपोर्टस्, लग्नानंतर आलेले प्रत्यक्ष अनुभव हे बाजू मांडण्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे ठरतात. एकदा न्यायालयाने विवाह रद्द झाल्याचे नमूद केल्यावर लग्न कधी झालेच नव्हते असा त्याचा अर्थ होतो. म्हणून नवरा बायको घटस्फोटीत न होता अविवाहित होतात.  

लग्नाच्या वेळी स्वतःबद्दल संपूर्ण माहिती न देणे, कमतरता आणि अवगुण लपवणे यात आपण दुसऱ्याला फसवत आहोत, असे अनेकांना वाटतच नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जोपर्यंत लपवू शकू तोपर्यंत हा लपवा-छपवीचा खेळ खेळू. एकदा लग्न झाले की लोक चालवून घेतील अशी अनेकांची विकृत मानसिकता असते. पण या सगळ्यात व्यावहारिक नुकसानासोबत दोन्ही कुटुंबांचे कधीही भरून न येणारे भावनिक नुकसान होते, हे ही तितकेच खरे.