त्रिकोणासन

'त्रिका' म्हणजे तीन व 'कोण' म्हणजे कोन. त्रिकोण म्हणजे तीन कोन. ह्या आसनामध्ये आपल्या शरीराचा आकार त्रिकोणाप्रमाणे होतो म्हणून या आसनाला 'त्रिकोणासान' म्हणतात.

Story: संतुलन मंत्रा | अंजली पाटील |
24th June 2022, 10:04 pm
त्रिकोणासन

हे आसन करण्यापूर्वी घ्यायची काळजी:

१) आसन करण्यापूर्वी शरीराचे शिथिलीकरण अवश्य करावे. 

२) आसन प्रसन्न वातावरणात, शांत चित्ताने करावे. 

३) हे आसन नेहमी रिकाम्या पोटी करावे. 

हे आसन कुणी करू नये?

१) ज्यांना मानेचा विकार आहे त्यांनी हे आसन करू नये. 

२) ज्यांना उच्चरक्तदाब आहे त्यांनी हे आसन करू नये. 

३) ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. 

४) गर्भवती महिलांनी हे आसन करु नये. 

हे आसन कसे करावे ?

१) सर्वप्रथम सरळ उभे रहा.

२) आता पायामध्ये दोन - तीन फुटांचे अंतर ठेवा. 

३) आता दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत जमिनीला समांतर असे पक्ष्यांच्या पंखासारखे पसरा. 

४) आता हळूहळू कमरेच्या वरचा भाग आपल्या उजव्या बाजूला झुकवा. 

५) आता उजव्या तळहाताने उजव्या पायाचा पंजा पकडा किंवा पावलांच्या बोटांना स्पर्श करा. दोन्ही गुडघे वाकता कामा नयेत. 

६) अंतिम स्थितीत डाव्या हाताची स्थिती दोन प्रकारे करू शकता. 

७) पहिल्या स्थितीत डावा हात उजव्या हाताच्या सरळ रेषेत ठेवा आणि दुसर्‍या स्थितीत डाव्या हाताची भुजा डाव्या कानाच्या वर ठेवून त्रिकोणाची आकृती तयार होईल. आता हीच क्रिया डावीकडे झुकून करा. 

८) खाली झुकताना श्वास सोडा व वर येताना श्वास घ्या. 

९) आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये १०-१२ सेकंद आपल्या क्षमतेनुसार थांबा.

ह्या आसनाचे फायदे:

१) हे आसन केल्याने मलावरोध दूर होतो. 

२) पायाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 

३) हे आसन नियमित केल्यास पाठीचा कणा लवचिक होतो. 

४) ह्या आसनाच्या सरावाने मानेचे विकार व पाठदुखी बारी होते. 

५) ह्या आसनामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

६) ह्या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या छातीचा आकार वाढविण्यास मदत होते.

७) ह्या आसनामुळे आपले मानसिक संतुलन चांगले राहते.

काही महत्त्वाच्या टिप्स:

१) हे आसन मधुमेहिंसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 

२) ह्या आसनामुळे आपल्या शरीराचे संतुलन व्यवस्थित होते.