अग्रलेख । बंडाळी की डाव ?

राऊत यांच्या आवाहनानंतर शिंदे गटाकडून कशी प्रतिक्रिया येते त्यावर पुढचे गणित अवलंबून आहे. हा सगळा डाव शिवसेना भाजपचाच होता की जे घडत आहे ती खरोखरच बंडाळी आहे याबाबत अजूनही लोकांमध्ये संशयच आहे.

Story: अग्रलेख |
24th June 2022, 01:24 am
अग्रलेख । बंडाळी की डाव ?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवरील संकट आता टाळता येणार नाही अशा स्थितीत आहे. कुठल्याही क्षणी महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडू शकते. म्हणजे भारतीय जनता पक्षाला जे अपेक्षित होते ती गोष्ट आता पूर्ण होताना दिसत आहे. शिवसेना प्रमुखांनी पाठ फिरवली तरीही भाजप एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करणार आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी एका व्हिडीओद्वारे भाजपसोबत जाण्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या चुकांवरही बोट ठेवले आहे. शिवसेनेतून वेगळे न होता आम्ही किल्ला लढवू असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावरून पुढे काय होणार आहे ते आता अधिक स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला माघारी बोलावले आहे. सगळे आमदार सांगत असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडू अशा निर्णयाप्रत शिवसेना आली आहे. राऊत यांच्या या विधानानंतर शिंदे गटाला निर्णय घ्यायचा आहे. अशाही परिस्थितीत जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत न येता स्वतंत्र गट म्हणून राहत असतील तर त्यांना उद्धव ठाकरेच नको आहेत असा त्याचा अर्थ होईल. आतापर्यंत शिवसेना फोडण्यासाठी झालेल्या अनेक प्रयत्नांपैकी शिंदे यांनी केलेला हा एक प्रयत्न आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे असे अनेक नेते शिवसेना सोडून गेले. त्यांच्या जाण्याने शिवसेना संपेल असे त्या नेत्यांना वाटत होते, पण तसे काहीही झालेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही शिवसेना तेवढ्याच जोमाने तग धरून आहे. आता तर शिवसेनेची सत्ता आहे. पण ही सत्ता शिवसेनेतीलच लोकांना पाहवत नाही याचे जेवढे दुःख उद्धव ठाकरे यांना आहे, तेवढेच दुःख आम्हाला किंमत दिली जात नाही असे ज्या आमदारांना वाटते त्यांचे आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा वाद जेवढा वाढत जात आहे तेवढीच भाजपची या सर्वाला फूस आहे ही बाबही सर्वांसमोर येत आहे. भाजपला जे हवे होते तेच महाराष्ट्रात होणार आहे. उद्ध्व ठाकरे कदाचित सरकारचा भाग नसतीलही, पण आतापर्यंत ज्या घडामोडी होत आहेत ते पाहता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला भाजपाच्या दावणीला बांधण्याची पूर्ण तयारीच केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळाप्रमाणे सध्याच्या घडीला शिवसेनेचे आमदार ५५ आहेत. त्यातील ४८ आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे असा दावा एकनाथ शिंदेंचा आहे. राष्ट्रवादीकडे ५३ तसेच काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. भाजपकडे १०६ आमदार आहेत. देशभर सर्व राजकीय पक्ष काँग्रेसची साथ सोडत असताना महाराष्ट्रात सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली हेच काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. शिवसेनेशी युती ही अशक्य कोटीतील गोष्ट होती, त्यामुळे आज ना उद्या हे संबंध तुटणारच होते. शिवसेनेने मुख्यमंत्रीपद सोडून जर भाजपसोबत जाण्याचे ठरवले किंवा एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील आमदार घेऊन नवा गट स्थापन करून भाजपसोबत सरकार स्थापन केले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना काही बोलण्याचीही भूमिका राहणार नाही. अशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. तो त्यांचा नाईलाज आहे. एकनाथ शिंदे गट व भाजपची सत्ता येत असेल तसेच उद्धव ठाकरे अलिप्त राहत असतील तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणे हे राजकीयदृष्ट्या पुढे महत्त्वाचेही ठरू शकते.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला आसाममधून महाराष्ट्रात परत यावे असे सुचवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडण्याची तयारी आहे, पण सर्व आमदारांनी तसे सांगावे असे म्हटल्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीतून विभक्त होण्यास तयार आहे हे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटातून ज्या प्रकारची विधाने येत आहेत ते त्यांना ठाकरे सोबत राहण्याची इच्छाच नाही असे दर्शवते. राऊत यांच्या आवाहनानंतर शिंदे गटाकडून कशी प्रतिक्रिया येते त्यावर पुढचे गणित अवलंबून आहे. हा सगळा डाव शिवसेना भाजपचाच होता की जे घडत आहे ती खरोखरच बंडाळी आहे याबाबत अजूनही लोकांमध्ये संशयच आहे. पुढे काय होईल त्याकडेच सर्वांच्या नजरा आहेत.