मुसळधार पावसाने राजधानी पणजी बुडाली

सायंकाळपर्यंत अडीच इंच पावसाची नोंद


23rd June 2022, 11:43 pm
मुसळधार पावसाने राजधानी पणजी बुडाली

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी :
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात गुरुवारी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पणजी शहरातील गटार तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून काही दुकानातही शिरले. पणजीत सकाळी ८.३० ते सायंकाळपर्यंत ५९ मिमी (अडीच इंच) पावसाची नोंद झाली. गेले तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी सरासरी ३४ टक्के पाऊस कमी आहे. आतापर्यंत राज्यात ४४४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
राजधानी तुंबली
गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पणजीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. सकाळपासून पडलेल्या पावसामुळे पणजी शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले हाेते. पणजीतील १८ जून रस्ता, पणजी दिवजा सर्कलकडे माेठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकी अर्ध्यापाण्याखाली गेल्या हाेत्या.
राजधानी पणजी ही स्मार्ट सिटीअंतर्गत येत असून पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी पणजी महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. स्मार्ट सिटीअंतर्गतही कराेडाे रुपये खर्च करून शहराचे सौंदर्यीकरण केले आहे. पण तरीही पावसाळ्यात शहरातील गटारे तुंबतात. यावर्षीही या स्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागले.
पणजी शहरात ठिकठिकाणी गटारे कचऱ्याने भरून वाहत होती. ज्या सखल भागात पावसाचे पाणी जात होते त्या ठिकाणी मोठमोठी बांधकामे झाल्याने पणजीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी ही स्थिती उद्भवली आहे.
रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात गेले तीन दिवस जोराचा पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. सांतइनेज येथील चर्चच्या बाजूच्या मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे नव्यानेच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटल सेतुच्या प्रवेशद्वाराजवळ पणजीच्या बाजूचा रस्ता सकाळी पाण्याखाली गेला होता.
वाहनचालकांची तारांबळ
गुरुवारी सकाळी कोसळलेल्या पावसामुळे मिरामार सर्कल, दिवजा सर्कल, पणजीतील १८ जून रस्ता, पाटाे अादी भागांत पाणी साचले होते. त्यामुळे अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली. ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. तर ताळगाव-करंझाळे येथील एका इमारतीचा संरक्षक कठडा पावसामुळे कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वत्र घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, चोडण, सावईवेरे, गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल, असोल्णा, कुंकळ्ळी, मडकई, पिळर्ण, काणकोण या भागांत झाडे कोसळली तर सावईवेरे आणि मडकई येथे वीजवाहिन्यांवर झाडे कोसळली. त्यामुळे त्या त्या भागात तात्काळ वीजपुरवठा खंडित करावा लागला. 

मागील २४ तासांतील पाऊस
ठिकाण..... पाऊस (मिमी)
म्हापसा  ६५
पेडणे  ५०.८
फोंडा  २७
पणजी  २८.६
जुने गोवे  २३.२
साखळी  ७.६
वाळपई  ११.२
काणकोण  ७२.८
दाबोळी  ३८.८
मडगाव  २५.३
मुरगाव  ३१.६
केपे  ५७.४
सांगे  ३८.३