'धर्मवीरा'वर निष्ठा असूनही 'कर्मवीरा'चे बंड!

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून संरक्षण ही भाजपसोबत जाण्यामुळे मिळणारी अतिरिक्त बाब आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते आजच्या काळात महत्त्वाचे आहे.

Story: विचारचक्र | विजय चोरमारे |
23rd June 2022, 11:32 pm
'धर्मवीरा'वर निष्ठा असूनही 'कर्मवीरा'चे बंड!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठीच्या संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात येण्यासंदर्भातला निर्णय तोपर्यंत झाला नसल्यामुळे बाकीचीच नावे पुढे येत होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. कारण ठाकरे यांच्यानंतर जनाधार असलेले शिवसेनेतील सर्वात प्रभावी नाव होते. त्याव्यतिरिक्त सुभाष देसाई, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांचीही नावे होती. एकनाथ शिंदे यांचे नाव सर्वात पुढे असले तरी शिवसेनेतून त्या नावावर शिक्कामोर्तब होणार नाही, असा अनेकांचा अंदाज होता. त्याचे कारण असे सांगितले जात होते की, शिवसेना आपल्या पक्षात दुसरा नारायण राणे तयार होण्याची जोखीम घेणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा संशय तेव्हापासूनचा होता.

मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी चर्चा करताना राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्याबाबत जो अंदाज व्यक्त केला जात होता, तो अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच खरा ठरवला. मुख्यमंत्रिपदाऐवजी त्यांना नगरविकास खाते आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेले समृद्धी महामार्गाशी संबंधित सार्वजनिक बांधकाम खातेही मिळाले. ही दोन खाती एवढी मालदार आहेत, की मुख्यमंत्री असलेले समृद्धी महामार्गाशी संबंधित काम खातेही मिळाले. ही दोन खाती एवढी मालदार आहेत, की मुख्यमंत्री न होताही एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड केले. नारायण राणे आधी बरेच दिवस आपली नाराजी जाहीर करीत होते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत प्रतिकूल शेरेबाजी करीत होते. त्यामुळे त्यांचे पक्षाबाहेर पडणे शिवसेनेसाठी धक्कादायक नव्हते. किंबहुना राणेंनी बाहेर पडावे अशीच परिस्थिती तयार करण्यात आली होती. शिवाय त्यावेळी शिवसेना विरोधी बाकावर होती, त्यामुळे शिवसेनेला गमावण्यासारखे काही नव्हते. एकनाथ शिंदे यांचे नेमके उलटे झाले आहे. आदल्या दिवसापर्यंत पक्षाचे निष्ठावंत म्हणून मिरवणाऱ्या शिंदे यांनी एका रात्रीत पलटी मारून थेट सूरत गाठली आणि पक्षाविरुद्ध बंडाचा झंडा फडकावला. हे करताना त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले सरकारही अडचणीत आणले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके किती आमदार आहेत आणि विधिमंडळात शक्तिप्रदर्शन होईपर्यंत त्यांच्यासोबत किती आमदार राहतात, हे स्पष्ट झाल्याशिवाय या बंडामुळे शिवसेनेच्या नेमक्या नुकसानीचा अंदाज येणार नाही. 

अलीकडेच एकनाथ शिंदे पुरस्कृत म्हणता येईल असा आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकनाथ शिंदे यांनी खूप वेळ खर्च केला. ठाणे महापौर निवडणुकीत शिवसेनेविरुद्ध मतदान करणाऱ्या श्रीधर खोपकर यांची हत्या ही महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय हत्यांपैकी एक मानली जाते. त्याच्याशी आनंद दिघे यांचे नाव जोडले जाते. या चित्रपटाच्या निमित्ताने शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या निष्ठेवर बरीच प्रवचने झोडली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला नाही, तोवर खुद्द धर्मवीर आनंद दिघे यांचे चेले असलेल्या एकनाथ शिंदे यांनीच पक्षाशी गद्दारी केली आणि ते आश्रयासाठी थेट मोदी-शहांच्या गुजरातमधील सूरत शहरात गेले. म्हणजे मूळ सिनेमातले नाट्यही फिके पडावे, अशी ही नाट्यमट घटना आहे. दिघे यांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि दिघे यांच्यामागील धर्मवीर या विशेषणाप्रमाणेच नावामागे ज्यांचे भक्त कर्मवीर हे विशेषण लावतात, त्या एकनाथ शिंदे यांच्याच राजकीय आयुष्यातील ही घटना आहे. सिनेमा खरा आणि वास्तवातले जगणे खोटे असते असे म्हणायचे की सिनेमातले खोटे असते आणि वास्तव त्याहून भिन्न असते असे म्हणायचे ?

एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या खेळाचा शेवट नेमका काय होणार आहे, याचा अंदाज एवढ्यात येणार नाही. कारण एकनाथ शिंदे यांना जरी वाटत असले की या खेळाचे नायक आपण आहोत आणि आपण नेऊ तशी कथा पुढे जाईल,तर तो त्यांचा भ्रम म्हणता येईल. एकनाथ शिंद यांनी खेळ सुरू केला असला तरी त्याची पटकथा देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली असावी आणि दिग्दर्शन अमित शहा करीत असावेत. त्यामुळे हे दोघे नेतील तसे फरफटत एकनाथ शिंदे यांना जावे लागणार आहे. आपण शिवसेनेला आव्हान दिल्यामुळे वाढदिवसाला लागणाऱ्या भव्य पोस्टरएवढी स्वतःची प्रतिमा मोठी झाल्याचा भ्रमही एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार आपल्यासोबत असल्यामुळे आपणच खरे शिवसेना पक्षप्रमुख झाल्याचा भासही त्यांना होऊ शकतो. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवक्ते त्यासाठीची वातावरणनिर्मिती करू लागले आहेत. नकली शिवसेना आणि असली शिवसेना अशी भाषा वापरली जाऊ लागली आहे, परंतु अशा टीव्हीवरील चर्चेच्या आहारी जाऊन एकनाथ शिंदे आपलीच शिवसेना खरी असल्याचे मानू लागले असतील तर त्यांचा भ्रमनिरास फार लवकर होईल कारण शिवसेनेच्या बाबतीत असे भ्रम यापूर्वीही निर्माण करण्यात आले होते. परंतु त्यात कुणाला यश आले नाही. राज ठाकरे चाहेर पडले ते तेच खरे शिवसेनाप्रमुखाचे वारसदार असल्याची चर्चा माध्यमांतून केली जात होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा तेवढा प्रभाव नव्हता. राज यांच्याइतके त्यांचे व्यक्तिमत्त्य आणि वक्तृत्वही प्रभावी नव्हते. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांचीच ताकद राहिली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांनी संघटनेवरील आपला प्रभाव टिकवून ठेवला. शिवसेना म्हणजे ठाकरे परिवार हे समीकरण आहे. शिवसेना ही नेत्यांची, आमदार-खासदारांची संघटना नाही. ती शिवसैनिकांच्या बळावर उभी असलेली संघटना आहे. त्यामुळे जास्ती आमदार आपल्यासोबत असल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला काडीची किंमत नाही. फारतर उरलेली दोन वर्षे शिवसेनेला सत्तेतून बेदखल करण्यापुरती ही ताकद त्यांना वापरता येतील. परंतु त्यानंतर किंवा दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका झाल्या, तर त्यांच्यासोबत असलेल्या ९० टक्के आमदारांना पुन्हा विधानसभेचे तोंड पाहता येणार नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर आणि मलईदार खाती सांभाळल्यानंतर एकनाथ शिंदे यांना हिंदुत्वाचा साक्षात्कार झाला आहे. ईडी, इन्कम टॅक्सची गिधाडे घिरट्या घालू लागली की भल्याभल्यांना तेहतीस कोटी देव आठवतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हिंदुत्व आठवायला लागले, याचे आश्चर्य वाटायला नको.

मुद्दा राहिला एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आजच्या काळातल्या राजकारणाशी सुसंगत आहे, असे म्हणता येणार नाही. करोना काळ आणि पाठोपाठ त्यांचे दीर्घ आजारपण आले. म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाली. एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची खाती असली तरी शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना फारसे स्थान नसल्याचे दिसून येत होते. म्हणून थेट सरकार उलथवून विरोधकांच्या कटात सामील व्हायचे, हे कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. या बंडानंतर यदाकदाचित भाजपचे सरकार स्थापन झाले तर एकनाथ शिंदे यांना आता आहे त्यापेक्षा फार काही मिळेल, याची अजिबात शक्यता नाही. उपमुख्यमंत्रिपद मिळाले तर डोक्यावरून पाणी म्हणावे लागेल. पण नुसते नामधारी उपमुख्यमंत्रिपद मिळेल. भाजपच्या सरकारमध्ये निर्णयाचे अधिकार खालच्या कुणाला मिळत नसतात. शिवसेनेत आपल्याला सन्मान मिळत नाही, तो भाजपमध्ये मिळेल, असे एकनाथ शिंदे यांना आशा वाटत असेल तर त्यांनी जरा आपल्याच जिल्ह्यातल्या नवी मुंबईचे सम्राट गणेश नाईकांच्या यांच्याकडे बघून घ्यावे, म्हणजे बाहेरच्या मंडळींना भाजपमध्ये किती सन्मान मिळतो ते कळेल. अर्थात केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईपासून संरक्षण ही भाजपसोबत जाण्यामुळे मिळणारी अतिरिक्त बाब आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते आजच्या काळात महत्त्वाचे आहे.