आयसीसी क्रमवारी : दिनेश कार्तिकची मोठी झेप

टी-२० क्रमवारीत : ईशान किशन टॉप टेनमध्ये दाखल

|
23rd June 2022, 12:33 Hrs
आयसीसी क्रमवारी : दिनेश कार्तिकची मोठी झेप

मुंबई : आपल्या आयपीएल मधील कामगिरीवर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकने टी-२० रॅकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील त्याने चांगली कामगिरी बजावत आयसीसी रॅकिंगमध्ये सुद्धा १०८व्या स्थानावरून ८७ स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्यासह सलामीचा फलंदाज ईशान किशान याने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. ईशान किशनने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली होती.
ईशान किशनने या मालिकेत ४१च्या सरासरीने २०६ धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला होता. याच कामगिरीमुळे ईशान किशन याने टी-२० क्रमवारीमध्ये थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहा विकेट घेणारा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनेदेखील २३ स्थानी झेप घेतली आहे.
अष्टपैलू रॅगिंकमध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आपले पहिले स्थान राखून आहे. सध्या जडेजा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये संघासोबत तयारी करत आहे. बांग्लादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा ऑलराऊंडरच्या रॅकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

भारताच्या फलंदाजांचा विचार केला तर माजी कर्णधार विराट कोहली ७४२ अंकासह कसोटी क्रमवारीत आपले १० क्रमांकाचे स्थान टिकवून आहे. तसेच अनुभवी स्पिनर रवीचंद्रन अश्विन ८५० अंकासह, तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ८३० अंकासह गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

फलंदाजीत बाबर, गोलंदाजीत हेजलवूड प्रथम
फलंदाजीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अद्याप पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारताचा ईशान हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. गोलंदाजांचा विचार केला तर जॉश हेझलवूड याने आपले पहिले स्थान आबाधित ठेवले आहे. तसेच अफगानिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान आणि श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा यांनी एक स्थानाची बढती घेऊन अनुक्रमे तिसरे व सहावे स्थान पटकावले आहे.