पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केल्याने एकास कारावास


14th June 2022, 12:24 am
पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केल्याने एकास कारावास

सांगे : पहिली पत्नी हयात असताना तसेच तिला घटस्फोट न देता कायदेशीर दुसरे लग्न केल्याप्रकरणी कुळे येथील साईनाथ खांडेपारकर याला भारतीय दंड सहितेच्या ४९४ कलमाखाली दोन वर्षांचा सश्रम कारावास व दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश सांगे न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता गावणेकर यांच्या न्यायालयाने दिला आहे. शिवाय आरोपीने खोटी कागदपत्रे तयार केल्यामुळे न्यायालयाने त्याला भादंसंच्या १९३ कलमाखाली एक वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेशही दिला आहे.
दरम्यान, कुळे येथील साईनाथ खांडेपारकर याने आपले पहिले लग्न सांगे येथील लग्न नोंदणी कार्यालयात कागदपत्रे सादर करून केले होते. तर दुसरे लग्न पहिली पत्नी जिवंत असताना व तिला घटस्फोट न देता धारबांदोडा येथील नाव नोंदणी कार्यालयात खोटी कागदपत्रे सादर करून केले होते. याप्रकरणी आरोपीने निर्धारित वेळेत दहा लाखांची रक्कम जमा न केल्यास आणखी एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. अर्जदाराची बाजू अॅड. अभिलाषा नाईक यांनी मांडली.