टोमॅटो दराची शंभरी पार!

‘फलोत्पादन’मध्ये ७५ रुपये प्रतिकिलोने उपलब्ध

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May 2022, 01:21 Hrs
टोमॅटो दराची शंभरी पार!

- संततधार अवकाळी पावसाचा फटका
- कोल्हापूर, बेळगावातील शेतीचे नुकसान
- नवे पीक येईपर्यंत दर उतरण्याची शक्यता नाही

पणजी : राज्यात खुल्या बाजारात टोमॅटोने शंभरी पार केली असली तरी, गोवा फलोत्पादन महामंडळात ७५ रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध आहे. यापेक्षा आणखी कमी दरात टोमॅटो विकणे महामंडळाला परवडणारे नाही. पुढील किमान १५ दिवस टोमॅटोच्या किमती उतरण्याची शक्यता नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सोमवारी स्पष्ट केले.
गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात सातत्याने अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. टोमॅटो तर जवळपास कुजलेला आहे. गाेव्यात बेळगाव बाजारपेठेतून टोमॅटो आयात केला जातो. अवकाळी पावसामुळे तेथील बाजारातही टोमॅटोची आवक प्रचंड घटली आहे. परिणामी गोव्यात टोमॅटोचे दर शंभरीपर्यंत गेले आहे. तरीही फलोत्पादन महामंडळ जनतेला होईल तेवढ्या कमी किमतीत टोमॅटो देण्याचा प्रयत्न करत आहोत. ७५ रुपये प्रतिकिलो यापेक्षा कमी दराने टोमॅटो विकणे परवडणारे नाही. आता पुढे टोमॅटोचे नवीन पीक येई पर्यंत टोमॅटो स्वस्त होणे शक्य नाही, असे आमदार शेट यांनी सांगितले.
दरम्यान, मान्सूनपर्यंत अवकाळी पाऊस असाच कायम राहिल्यास भाज्यांचे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे, अशी माहिती म्हापसा बाजारपेठेतील एका भाजी विक्रेत्यांने दिली आहे. बेळगाव आणि कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडल्याने तेथील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोपाठोपाठ वालपापडीचा दरही दुप्पट झाला आहे. सध्या वालपापडीचा दर १३० रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे, असेही त्याने सांगितले.

- म्हापसा बाजारपेठेत टोमॅटोचे दर १०० रुपये प्रतिकिलो असे असून पणजी बाजारपेठेत १०५ ते १२० रुपयांपर्यंत हे दर गेले आहेत. टोमॅटो पाठोपाठ वालपापडीचा दर १३० रुपये प्रतिकिलो असा झाला आहे. तर फरसबी १४० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

- काही ठिकाणी कोथिंबिरीचे दरही वाढले आहेत. २० रुपयांना अतिशय लहान पेंडी तर, मोठी पेंडी ४० रुपये याप्रमाणे विकली जात आहे. याशिवाय अंडी आणि चिकनचा दरही वाढला आहे. अंडी ६५ रुपये डझन तर चिकन २०० रुपये किलोप्रमाणे झाला आहे.