कला अकादमीच्या मूळ आराखड्यातच दोष

मंत्री गोविंद गावडे यांचा दावा; वस्तुस्थिती जाणून घेण्याचा विरोधकांना सल्ला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May 2022, 01:15 Hrs
कला अकादमीच्या मूळ आराखड्यातच दोष

कला अकादमीच्या दुरुस्तीकामाची पाहणी करताना कलामंत्री गोविंद गावडे. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुविशारद चार्ल्स कुरैया यांनी डिझाइन केलेल्या येथील कला अकादमीच्या मूळ आराखड्यात अनेक दोष होते, हे आता समोर येत आहे. अकादमीच्या भिंती खचल्या आहेत. काँक्रीटमधील लोखंड गंजले आहे. यावरून मूळ आराखडा बनवताना देखभालीचा विचार करण्यात आला नाही, हे स्पष्ट होते, असे कला अकादमीचे अध्यक्ष तथा कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटले आहे.
कला अकादमीच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. मंत्री गावडे यांनी सोमवारी पत्रकारांसमवेत या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील बाब स्पष्ट केली. अकादमीच्या मूळ वास्तुतील दोष सुधारायचे असतील तर काही बदल करणे स्वाभाविक आहे. अकादमीच्या व्हरांड्यामध्ये कोटा होता. आता अशी कोटा पद्धत नाही. सभागृहात पाणी भरत होते. असे दोष दूर करणे आवश्यक आहे. विरोधकांनी सर्व वस्तुस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे. कला अकादमीच्या दुरुस्तीवर मोठा खर्च झाला आहे. या खर्चात आणखी एक कला अकादमी बांधता आली असती, असेही मंत्री गावडे यावेळी म्हणाले.
पावसात कला अकादमीमध्ये पाणी तुंबायचे. आता येथे पाणी साचू नये म्हणून क्रिकेट खेळपट्ट्यांसारखे तंत्रज्ञान वापरले जाईल. या खास तंत्रज्ञानाची तपासणी पावसात केली जाईल, असेही मंत्री गावडे यांनी यावेळी सांगितले.

मूळ ब्लॅक बॉक्समध्ये पूर्वीच केला आहे बदल

कला अकादमीचे २००४ साली दुरुस्तीकाम झाले होते. त्यावेळी ब्लॅक बॉक्सच्या मूळ रचनेत बदल करण्यात आला होता. तेव्हा खुद्द चार्ल्स कुरैया हयात होते. त्यांनीही त्या दुरुस्तीला आक्षेप घेतला नव्हता. पण, आताच्या कामास मात्र चार्ल्स कुरैया फाउंडेशन दुरुस्ती कामाला आक्षेप घेत आहे, असे मंत्री गावडे यावेळी म्हणाले. कला अकादमीच्या दुरूस्तीचा विषय आला तेव्हा संबंधितांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळी चार्ल्स कुरैया फाउंडेशनकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सूचना सादर केल्या नाहीत. मात्र, आता पाहणी न करताच सुरू असलेल्या कामावर आरोप करत आहेत. हे योग्य नाही, असेही मंत्री गावडे म्हणाले. आताही फाउंडेशन या कामाची पाहणी करू शकते, असे ते म्हणाले.

दुरुस्तीकाम पूर्ण करण्याची ऑगस्टपर्यंत कालमर्यादा

कला अकादमीचे दुरुस्तीकाम पूर्ण करण्यासाठी ऑगस्टपर्यंत कालमर्यादा आहे. सध्या एकोस्टिक आणि फिनिशिंगचे काम बाकी आहे. ऑगस्टमध्ये नूतनीकृत कला अकादमीचे लोकार्पण करण्याचे प्रयत्न अाहेत. या संपूर्ण कामाची निविदा ४० कोटींची आहे. पण आतापर्यंत १० कोटी कंत्राटदाराला दिले आहेत, असे मंत्री गावडे यावेळी म्हणाले.

इफ्फीसाठी अकादमी उपलब्ध होणे कठीण

ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्धार केला असला तरी पावसाच्या स्थितीवर कामात काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. म्हणूनच यंदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) उपलब्ध होऊ शकणार नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कळवले आहे. काम ठरल्याप्रमाणे ऑगस्टमध्ये पूर्ण झाले, तरच इथे इफ्फी होऊ शकतो, असेही मंत्री गोविंद गावडे म्हणाले.