भरधाव वेगाने घेतला तिघांचा बळी

कुचेलीत कारची झाडाला धडक : बेळगावातील तरुणांचा मृत्यू, एक गंभीर


23rd May 2022, 12:45 am
भरधाव वेगाने घेतला तिघांचा बळी

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

म्हापसा : म्हापशाला जाणाऱ्या स्विफ्ट कारला रविवारी पहाटे ३ च्या सुमारास कुचेली म्हापसा येथे मार्ना रस्त्यावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या बाजुच्या आंब्याच्या झाडाला जोरदार धडक दिली. यात बेळगाव येथील तीन युवक जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.      

मृतांमध्ये कारचालक नायर हसनसाब अनगोळकर (२८, रा. टिळकवाडी, बेळगाव), रोहन महादेव गडद (२६, रा. रामदेव गल्ली, बेळगाव) व सनी उर्फ धीरज पोसाप्पा अणवेकर (३२, रा. गणेशपूर, बेळगाव) यांचा समावेश आहे. विशाल विलास कारेकर (२७, रा. दत्तात्रय गल्ली, वडगाव, बेळगाव) हा गंभीर जखमी आहे. त्याच्या उजव्या हाताचे हाड मोडले असून जखमीवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.        

मयत नायर अनगोळकर याचा वडिलोपर्जित लॉजि‌स्टिकचा व्यवसाय आहे. अपघातात सापडलेल्या इतर तिन्ही मित्रांचाही व्यवसाय आहे. व्यवसायामुळे अनगोळकर याची गोव्यात नेहमीच ये-जा होती. त्याची विवाहित बहीण गोव्यात असते. आपले काम असल्याचे सांगून वरील आपल्या तिन्ही मित्रांना घेऊन केए २२ एमए ९८१३ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने तो गोव्यात आला होता. शनिवारी संध्याकाळी उशिरा ते गोव्यात दाखल झाले होते. काम उरकून रात्री हणजूण येथे गेल्यानंतर मध्यरात्री ते काही खाण्यासाठी मिळेल म्हणून मार्ना शिवोली मार्गे भरधाव वेगाने म्हापशाकडे येत होते.

कुचेली येथे शेळपे कुचेली जंक्शनपासून दोनशे मीटरच्या अंतरावर नायर याचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या बाजूला गेली. त्याच स्थितीत अंदाजे ४० ते ५० मीटर जात कारने रस्त्याच्या बाजूच्या आंब्याच्या झाडाला धडक दिली. अंदाजे सहा ते सात फूट उडी घेत कार चालकाच्या बाजूने झाडाला धडकली व नंतर रस्त्याच्या दिशेने स्थिरावली. मोठ्या आवाजात कारस्टेरिओ वाजवत हे कारस्वार प्रवास करत होते. कारमधील समोरच्या दोघांनीही सीट बेल्ट लावला होता. या भयानक अपघातानंतर कारचा एअर बलूनही फुटला. कारचा चुराडा झाला आणि चारहीजण गंभीर जखमी होऊन आतमध्ये अडकून पडले. त्यातील वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी विशाल कारेकर हा मागील सीटवर डाव्या बाजूला बसला होता. त्याचा हात मोडला.      

म्हापसा पोलिसांना घटनेची माहिती रात्री ३.२०च्या सुमारास मिळाली. लगेच उपनिरीक्षक रीचा भोंसले, हवालदार उल्हास गावकर व सुशांत चोपडेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जखमी विशाल कारेकर कारमधून बाहेर आला होता.      

जखमी विशालला १०८ रुगणवाहिकेतून जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. कारमध्ये अकडून पडलेल्या तिन्ही मृतदेहांना अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. नंतर त्यांना जिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोमेकॉत शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. सायंकाळी उशिरा तिन्ही मृतदेह बेळगावला नेण्यात आले.

दुसऱ्या दिवशी होता मित्राचा विवाह

अपघातात सापडलेल्या युवकांच्या एका मित्राचे रविवारीच बेळगावला लग्न होते. या लग्न सोहळ्यात ते सामील होणार होते. शनिवारी हळदीच्या समारंभाला जखमी कारेकर याचा भाऊ व नातेवाईक होते. पहाटे ५.३०च्या सुमारास त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी गोव्याकडे धाव घेतली. अन्य युवकांचे नातेवाईक दुपारपर्यंत म्हापशात दाखल झाले.

एकुलता एक मुलगा गडद कुटुंबाने गमावला

रोहन हा गडद कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला एक लहान बहीण असून त्याच्या आईचे वर्षभरापूर्वी करोना काळात निधन झाले होते. अपघातीमृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.