व्हिंटेज कार जपणाऱ्यांना प्रोत्साहनाची गरज : सरदेसाई


23rd May 2022, 12:01 am
व्हिंटेज कार जपणाऱ्यांना प्रोत्साहनाची गरज : सरदेसाई

जुन्या गाड्यांच्या रॅलीची सुरुवात करताना आमदार विजय सरदेसाई. सोबत नगरसेवक महेश आमोणकर, साहिल नार्वेकर व इतर. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
जुन्या किंवा व्हिंटेज कार व दुचाकी या पोर्तुगीजकाळापासून जपून ठेवण्याचे काम गाड्यांच्या मालकांनी केलेले आहे. मात्र, राज्य सरकारकडून अशा गाड्यांवरील टॅक्स चारपट वाढवलेला आहे. हा वारसा जपणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर मानधन देण्याची गरज आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
फातोर्डा मतदारसंघात व्हिंटेज कार व दुचाकीची रॅली काढण्यात आली. या रॅलीआधी या सर्व गाड्या एसजीपीडीए मार्केटनजीकच्या मैदानावर उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी नागरिकांनी या गाड्यांसोबत फोटोही काढून घेतले. यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, जुन्या गाड्यांबाबतची राज्य सरकारची टॅक्सबाबतची पॉलिसी चुकीची असल्याने ती बदलण्याची मागणी जुन्या कार व दुचाकीधारकांकडून करण्यात आलेली आहे. राज्य सरकारची क्लासिक किंवा जुन्या गाड्यांबाबतची पॉलिसी चुकीची आहे. या गाड्या जुन्या असल्या तरी बंदावस्थेत नाहीत. त्याची जपणूक करण्यासाठी राज्य सरकारने या गाड्या मालकांना खरेतर प्रोत्साहनपर मानधन देण्याची गरज आहे. मात्र, सरकारने या गाड्यांचा पासिंग व रोड टॅक्स वाढवलेला आहे. पोर्तुगीज काळातील या गाड्या राखून ठेवण्याची गरज आहे.
राज्य सरकारकडून जुन्या गाड्यांचे रोड टॅक्स चारपट वाढवण्यात आलेले आहेत. या जुन्या गाड्या जपून ठेवण्यात येत असल्याने अशा गाड्यांवरील रोड टॅक्स कमी करण्यात यावा. तो पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी नाही. पण, काही प्रमाणात कमी करावा, अशी मागणी साहील नार्वेकर यांनी केली.

गाड्यांच्या माध्यमातून वारसा जपून ठेवण्याचे काम हे गाडीमालक करत आहेत, त्यामुळे राज्य सरकारने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही रक्कम देण्याची गरज असून ते सरकारचे कर्तव्य आहे. हा विषय आपण आगामी पावसाळी विधानसभा निवडणुकीत मांडणार आहे. _विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा
....