तिरंदाजी विश्वचषक : पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण

|
22nd May 2022, 12:02 Hrs
तिरंदाजी विश्वचषक : पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण

ग्वांगजू : भारतीय नेमबाजांनी २०२२ तिरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुषांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने अंतिम फेरीत फ्रेंच संघाचा पराभव केला. दुसरीकडे, कंपाऊंड मिश्र संघाने कांस्यपदक जिंकून पदकतालिकेत भारताचे स्थान सुधारले. महिला रिकर्व्ह संघ आधीच कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या कंपाउंड प्रकारात पुरुषांच्या सांघिक अंतिम फेरीत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले. अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहान यांनी अंतिम फेरीत फ्रेंच संघाचा २३२-२३० अशा जवळच्या स्कोअरसह पराभव करून पहिले स्थान पटकावले. या विजयानंतर भारतीय त्रिकुटाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पुष्पा या प्रसिद्ध चित्रपटाची खास स्टेप करताना आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे भारतीय संघाने तुर्कस्तानमध्ये झालेल्या याच स्पर्धेच्या विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्सच्या याच संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. ग्वांगजू येथील या स्पर्धेचे कांस्यपदक दक्षिण कोरियाला 

मिळाले.

महिला संघाला कांस्यपदक

रिकर्व्ह महिला संघात भारतीय संघाने कांस्यपदक जिंकून भारतीय पदकतालिकेत भर घातली. रिद्धी, कोमलिका बारी आणि अंकिता भगत या त्रिकुटाने तैवानच्या संघाविरुद्ध ३ सेट जिंकून पदक जिंकले. एकूणच, भारतीय संघ ६-२ अशा सेटच्या फरकाने कांस्य जिंकण्यात यशस्वी झाला. रिद्धीने एप्रिलमध्ये तुर्कीमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात तरुणदीप रॉयसह मिश्र सांघिक सुवर्णपदकही जिंकले होते.

मिश्र सांघिक कांस्यपदक

कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघाने तुर्कीचा पराभव करून कांस्यपदक पटकावले. अवनीत कौर आणि अभिषेक वर्मा यांनी मिळून आयेसा सुजेर एमिरकान हेनी या जोडीचा १५६-१५५ गुणांनी पराभव केला. तैवानच्या संघाने एस्टोनियाचा पराभव करत या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.

भारतीय नेमबाजांना एकेरी स्पर्धेत एकही पदक जिंकता आलेले नाही. २०२२ च्या तिरंदाजी विश्वचषकात एकूण ५ टप्पे असतील. पहिल्या चार टप्प्यांनंतर एकूण कामगिरीच्या आधारे विश्वचषक फायनलचे आयोजन केले जाईल. विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा १८ ते २४ एप्रिल २०२२ दरम्यान तुर्कीमधील अंतल्या येथे आयोजित करण्यात आला होता. १६ मे ते २२ मे दरम्यान, दुसरा टप्पा दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे होत आहे. तिसरा टप्पा २० ते २६ जून दरम्यान पॅरिसमध्ये तर चौथा टप्पा १८ ते २४ जुलै दरम्यान कोलंबियामध्ये होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. सध्या दोन टप्प्यांनंतर ३ सुवर्ण, १ रौप्य, ३ कांस्यांसह भारतीय संघ पदकतालिकेत अव्वल आहे, तर ब्रिटन दुसऱ्या आणि नेदरलँड तिसऱ्या स्थानावर आहे.