"हाॅकी, एक लक्ष्य" मानणारी : 'प्रज्वला'

रोजच्या मैदानावरील उपस्थितीने तिथे शारीरीक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी तिला मैदानावर उतरुन खेळण्यास प्रवृत्त केले. खेळ बघून थोडाफार रस आलेल्या या मुलीने अवघ्या काही दिवसांतच हाॅकीचे प्रशिक्षण घेतले.

Story: मार्ग नवा, ध्यास नवा | सुश्मिता मोपकर |
21st May 2022, 09:09 Hrs
"हाॅकी, एक लक्ष्य" मानणारी : 'प्रज्वला'

वेर्ला - काणका येथील प्रज्वला राजेश हरमलकर ही सद्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे. तिचे शालेय शिक्षण सेंट अँथनी मोंत-द-गिरी येथे झाले. तसेच तिचे अकरावी - बारावीचे शिक्षण सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. नृत्य आणि खेळ हे तिचे छंद आहेत. शाळेत असताना क्रीडामहोत्सवात अॅथलॅथिक्स, बॅडमिंटन यासारख्या खेळात तिने यश मिळविले आहे. त्याचबरोबर क्रिकेट आणि हाॅकी हे सुद्धा खेळ ती खेळत असे. खेळ खेळणे हा तिचा छंद असल्याने कोणत्याही खेळात ती मन रमवायची.

आपला छंद जपून त्यादिशेने पुढची वाटचाल अगदी चौथीत असल्यापासून सुरु झाली. सुरुवातीला मैत्रिणीबरोबर मैदानावर जाऊन फक्त प्रेक्षकाची भूमिका ती पार पाडायची. तिच्या रोजच्या मैदानावरील उपस्थितीने तिथे शारीरीक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी तिला मैदानावर उतरुन खेळण्यास प्रवृत्त केले. खेळ बघून थोडाफार रस आलेल्या या मुलीने अवघ्या काही दिवसांतच हाॅकीचे प्रशिक्षण घेतले. अतिशय जिव्हाळ्याने तिने स्वतःला पूर्णपणे या खेळात झोकून दिले. ती आपल्या वरिष्ठांना बघूनही या खेळाकडे ओढली गेली. तिचा एक सिनियर पांडुरंग साळकर याच्या खेळामुळे ती या खेळाशी पूर्णपणे समरस झाली. त्यावेळेस तो तिच्यासाठी आदर्श ठरला. त्याचबरोबर या क्षेत्रातील तिचे गुरु, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक सर लिईनो मिनेझिस आणि सर विक्टर अल्बुकर्क यांचा तिच्या या प्रवासात खूप मोठा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच प्रशिक्षणामुळे ती हॉकी शिकू शकली.

आतापर्यंत तिने राष्ट्रीय स्तरावर १२ वेळा गोव्याचे प्रतिनिधित्व केले असून ५ वेळा ती संघाची कॅप्टन म्हणून आघाडीवर राहिली आहे. अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ती पाचवीत असताना तिने सर्वप्रथम गोव्याचे प्रतिनिधित्व केले आणि ती पहिली खेळाडू होती जीने इतक्या लहान वयात हे यश मिळविले होते. हॉकीच्या तिच्या या प्रवासात अनेकदा तिला 'बेस्ट प्लेयर' तसेच 'हायस्ट गोल स्कोरर' अशी पारितोषिकेही मिळाली आहेत. आता भारताच्या हॉकी संघात सामील होऊन भारतासाठी प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही तिने कधीच पाठ फिरवली नाही. खेळाचा वेळ ठरवून उरलेल्या वेळेत अभ्यासाकडेही तिने लक्ष केंद्रित केले. दहावीनंतर तिने विज्ञान शाखा निवडली. सूक्ष्मजीवशास्त्र  (मायक्रोबायोलाॅजी) या विषयात तिला पदवी मिळवायची आहे. सूक्ष्म जीवांचा अभ्यास करणे, निरिक्षण करणे यात तिला विशेष रस आहे आणि त्याच दिशेने तिचा शैक्षणिक प्रवास सुरू आहे.  

शाळेत ती एन.सी.सी. संघातही होती. एन.सी.सी. च्या अनेक कँपमध्ये ती सहभागी झाली आहे. 'क्रोस कन्ट्री'मध्येही तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, तिने 'बेस्ट पर्फामिंग कॅडेट' म्हणून नाव मिळविले होते. तिच्या या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रवासात तिला तिच्या वडिलांचा भक्कम आधार लाभला. ज्या ज्या गोष्टीत तिला रस होता त्या गोष्टी करण्यासाठी त्यांनीच तिला प्रोत्साहन दिले आणि पुढे जाण्यास बळही दिले. 

आपल्या वयाच्या तरुणांसाठी संदेश देताना ती म्हणते, "तुम्हाला जे आवडते ते करा.  स्वतःला आनंदी करा, इतरांना नाही तर स्वतःला संतुष्ट करा.  स्वतःला प्रत्येक गोष्टीत सक्षम बनवा आणि इतरांसाठी आदर्श ठरा."