आनंदी जगण्याचा मूलमंत्र

आईने मुलीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह ‘प्रिय अहिल्या’ या पुस्तकाचे नुकतेच पणजी येथे प्रकाशन झाले. त्यानिमित्त...

Story: पुस्तक परिचय | नीलेश करंदीकर |
21st May 2022, 08:41 pm
आनंदी जगण्याचा मूलमंत्र

गरातून मार्गस्थ होणाऱ्या होड्या, जहाजं आणि मानवी आयुष्य यात बरंच साम्य असावं. निराळेपण असलं तरीही लाटांसोबत हेलकावे हे आलेच. शोध किनाऱ्याचा असतो. तोही प्रत्येकासाठी वेगळा. अशा प्रवासात आश्वस्त करतो तो दीपस्तंभ. प्रा. अदिती बर्वे यांचे ‘प्रिय अहिल्या’ वाचताना त्याची पुरेपूर प्रचिती येते. लेखिकेने आपल्या कन्येला लिहिलेल्या ४३ पत्रांचा हा संग्रह आहे.

पत्र म्हटलं की ‘पासून ते पर्यंत’ असा स्थूलमानाने प्रवास. हा प्रवास म्हणूनच अज्ञानाकडून ज्ञानाकडे, रिकाम्याकडून भरलेल्याकडे. इथे प्रवासाचा बोर्ड आहे पालक ते पाल्य. याच नात्याची सुपिक पायाभरणी आणि जीवनमूल्य, कौशल्यांची पेरणी त्यात आहे.

आकार नसलेली कुंभाराकडची कच्ची माती आणि लहान मुलं यामध्ये समान धागा असला तरी कुंभाराला नक्की काय घडवायचं आहे, याची पक्की जाणीव असते. पालकत्व निभावताना अगदी त्या उलट असावं! पाल्यावर आपली इच्छा लादण्याऐवजी त्याला जीवनाकडे पाहण्याचा व्यापक, सर्जनशील, निकाेप दृष्टीकोन द्यावा; त्यातून त्याची त्याने जीवनवाट शोधावी, ही धारणा पुस्तकातून उद्घृत होते.

बाल्यावस्थेत ‘श्रीगणेशा’पासून जशी अक्षर ओळख होते, त्याप्रमाणे ज्यामुळे माणसांना ओळख मिळते, त्या नावांनाही अर्थ असतो. त्यांचे महत्व विषद करणाऱ्या ‘नाव’ या पत्रापासून वाचनप्रवास सुरू होतो. त्यानंतर ‘कृतज्ञता’ हे पत्र ज्या-ज्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गोष्टींमुळे आपलं जगणं सुकरं होतं, त्यांच्याप्रति मनी सद्भावना असावी; सूर्याला वंदन, अन्नदाता, नातेवाईकांसाठी ‘सुखी भव’ अशी जाणीव मनी निर्माण करते. मनावरची आपली पकड घट्ट व्हावी, एकाग्रता वाढावी, ‘यथाभूत’ ज्ञान घेण्यास सक्षम बनावे यासाठी मनाला देण्यात येणारे प्रशिक्षण हे ‘आनापान’ या पत्रातून उलगडते. ‘प्रतिक्रिया आणि प्रतिसाद’मधून आपण चांगला श्रोताही असलं पाहिजे, ही अभावाने दिसणारी गोष्ट किती महत्वाची आहे ते कळते. ‘पैसा’ या पत्रातून अनेक गैरसमज हटकून दूर होतात. नवे अर्थभान लाभते. ‘निसर्गाचं संवर्धन’मधून अनेक जाणीवांना पालवी फुटते. आकर्षणाचा सिद्धांत, पडणं - रडणं - उठणं, मॅनिफेस्टेशन ही पत्रे लख्ख दृष्टी देतात. छंद, वाचन, मैदानी खेळ, शाळा, स्वत:ला स्वीकारणे,  माईंडमॅपिंग, परीक्षा, धर्म, सरकारी मालमत्ता आणि कर, महिला दिनाच्या निमित्ताने, पोर्टफोलिओ-शेअर मार्केट, आरोग्य अशा विविध विषयांचा वेध घेत पुस्तक अखेरीला ‘आनंदी असणं’ या महत्वाच्या थांंब्यावर वाचकाला पोहोचवतात. ही पत्रे कॅलिडोस्कोप आहेत. त्याचे कितीतरी आकार आणि रंग. विषयवैविध्याने अवाक होणे वाचकाला भाग पडते. ही नुसती पाल्यांसाठी पत्रंच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी कार्यशाळा आहे. तिला मुदत नाही. अखंड सुरू. पान उघडलं की भान आलं, एवढं सोपं.

सोपं लिहिणं नेहमीच अवघड. पुस्तकात अवघड वाटणारे विषय अत्यंत सोपे करून मांडले आहेत. पत्रे वाचताना निसर्गाशी नात्यापासून, इतिहास, विज्ञान, भूगोल, भाषेचे महत्व, गणित, शारीरिक जडणघडण, रामरक्षा, बुद्धाची शिकवण, पाश्चिमात्य लेखक, त्यांचे विचार या विषयी यथोचित संदर्भ वेळोवेळी ठशीवपणे समोर येतात. कोणताही विचार न लादता तार्किक कसोटीवर उलगडण्याचा कटाक्षाने प्रयत्न दिसतो.

उदाहरणार्थ - ‘‘अडीअडचणीला कामी येतील या कारणास्तव माणसं जोडू नकोस. असा विचार करणं खूपच नकारात्मक आणि स्वार्थी असतं. असं करताना आपल्या मनात नकळतपणे आपण अडीअडचणींना आपल्या आयुष्यात बाेलावत असतो. तू माणसांना प्रेम देत जा. चांगली माणसं आपोआप जोडली जातील’’.

‘‘आनंदाचे क्षण पेरले की आनंदच उगवणार’’.

‘‘मनात नेहमी चांगलेच विचार येतील असं नसतं. विचार चांगले असोत किंवा वाईट, त्या विचारांना तू सुपीक जमीन देतेयस की नाही, हे महत्वाचं. तुला कुणाचाही राग आला, तो राग तू पुन्हा पुन्हा गिरवलास, तर त्या व्यक्तीचं काहीही नुकसान होत नाही. नुकसान तुझंच होतं. तू रागाचं बीज मनात रुजत घातलंस ना तर भविष्यात तुझ्याच आयुष्यात रागाचे प्रसंग येण्याची जास्त शक्यता असते. केवळ तशी बी टाकली म्हणून नाही, तर मनाचा स्वभाव तसा घडवला म्हणून. या उलट तू मनात कृतज्ञता, करुणा, आनंद अशा वृक्षांची बीजं टाकलीस तर भविष्यात तुला कृतज्ञता, करुणा, आनंद व्यक्त करण्याच्या अनेक संधी येतील’’, असे अनेक परिच्छेद पत्रांत आहेत की, जे विचारप्रवर्तक नव्हे तर विचारप्रवृत्त करण्यात यशस्वी ठरतात.

येथे एक नमूद करायला हवे ते म्हणजे, ‘प्रिय अहिल्या’ असे नाव असले तरी ते वागनीदाखल. या अहिल्येच्या गरजा असणाऱ्या प्रत्येक पाल्याला त्याच्या पालकांनी लिहिलेली ही पत्र ठरावीत. प्रयोगशीलता, अनुभव, निरीक्षण, चिंतन यातून सापडलेल्या ‘बिट्विन द लाईन्स’ म्हणजे उपरोक्त पत्रे, असेही निरीक्षण नोंदवता येईल. लेखिकेने कोणतेही सल्ले न देता मुलीशी पत्ररूपी तरल आणि प्रभावीपणे संवाद साधला आहे. सक्षम निर्णय क्षमता अंगी बाणवून आत्मनिर्भर, आनंदी राहण्याचं कौशल्य शिकावं आणि आजच आनंदी राहाण्याची सवय करून घ्यावी, असा मूलमंत्र देणाऱ्या या पुस्तकाला शिक्षणतज्ज्ञ नारायण देसाई यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाच्या आशयाला अनुरूप रेखीव मुखपृष्ठ व मलपृष्ठ लाभले आहे. केवळ पालक, पाल्य, शिक्षकच नव्हे तर कोणत्याही वगोगटातील व्यक्तींसाठी हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरेल. म्हणूनच ‘प्रिय अहिल्या’ तुम्हीही एकदा वाचून पाहाच!