ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या उमेदवारांना महत्त्व

Story: विश्वरंग | सुदेश दळवी |
21st May 2022, 12:45 am
ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या उमेदवारांना महत्त्व

दि. २१ मे (शनिवारी) रोजी ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. दर तीन वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये निवडणूक घेतली जाते. सध्याचे ‘लेबर नॅशनल’ पक्षाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या विरोधात ‘लेबर’ पक्षाचे अँथोनी अल्बानीज यांचे तगडे आव्हान असल्याचा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणातही पंतप्रधान मॉरिसन यांची लोकप्रियता घसरल्याचे स्पष्ट झाले होते. मतदानपूर्व चाचणीमध्ये मजूर पक्षाचे अँथोनी अल्बानीज हे सध्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यापुढे होते. पण, अंतिम दिवशी स्कॉट मॉरिसन हे या निवडणुकीमध्ये बाजी मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.       

ऑस्ट्रेलियाच्या या निवडणुकीत तेथील भारतीय वंशीय मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ऑस्ट्रेलियात ब्रिटिश समुदायानंतर आता भारतीयच दुसऱ्या क्रमांकाचा समुदाय ठरला आहे. देशभरात ७ लाखांहून अधिक भारतीय वंशीय ऑस्ट्रेलियात राहत आहेत. भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन नागरिक कुठलाही नेता आणि पक्षाचे राजकीय भविष्य निश्चित करू शकतात. मॉरिसन आणि अल्बानीज सध्या मंदिर-गुरुद्वारांमध्ये जात मत देण्यासाठी आवाहन करत आहेत. अन्य पक्षांचे उमेदवारही भारतीय समुदायाशी संपर्क साधून मते मागत आहेत. दोन्ही मोठ्या पक्षांनी या संघीय निवडणुकीत १०० हून अधिक बिगरइंग्रजी भाषिक देशांशी संबंधित उमेदवारांना तिकीट दिले आहे. यात एक तृतीयांश उमेदवारी भारतीय वंशाच्या नेत्यांना मिळाली आहे. ऑस्ट्रेलियातील दोन मोठी राज्ये न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये भारतीय वंशीयांची संख्या अधिक आहे. प्रत्येकी २ लाखांहून अधिक भारतीय या राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. न्यू साउथ वेल्सची राजधानी सिडनीच्या पश्चिम भागात दोन्ही पक्षांदरम्यान चुरशीची लढत आहे. लिबरल पार्टीने तेथील ग्रीनवे मतदारसंघात प्रदीप पाठी यांना उमेदवारी दिली आहे. लिबरल पार्टीकडून दोन्ही राज्यांमध्ये भारतीयबहुल भागात भारतीय वंशाचे उमेदवार उभे केले आहेत. लेबर पार्टीकडून हिगिंस, ला ट्रोब, स्वान आणि वेर्रवा भागांमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी डॉ. सुखमनी खुराना यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय समुदायाबद्दल स्थानिक नेत्यांचा इतका ओढा यापूर्वीच कधीच पाहिला नव्हता, असे म्हटले आहे.रम्यान, २०१९च्या निवडणुकीत भारतीय वंशाचे २१ उमेदवार उभे राहिले होते. ऑस्ट्रेलियाच्या अनेक संघीय निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी तेथे आघाडी करावी लागते. अनेक मतदारसंघांमध्ये १ किंवा २ टक्के मते निकाल बदलू शकतात.

मोदींसोबतच्या मैत्रीचा किस्सा      

मॉरिसन यांनी काही दिवसांपूर्वी भगवी शाल ओढून घेत हिंदू कौन्सिलच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. भारतीय समुदायामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता पाहून त्यांनी मोदींसोबतच्या स्वतःच्या मैत्रीचे दाखले तेथे दिले होते. तसेच कौन्सिला १३.५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. लेबर पार्टीचे उमेदवार अँथोनी यांनीही त्यानंतर कौन्सिलच्या कार्यक्रमात भाग घेतला होता.