शापोराच्या विजयात फहीझचे दोन गोल


20th May 2022, 11:47 pm
शापोराच्या विजयात फहीझचे दोन गोल

पणजी : शापोरा युवक संघाने गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी कांदोळी एससीचा २-१ असा पराभव केला. गोवा युनायटेड स्पोर्टस् अकादमी आयोजित या स्पर्धेतील शुक्रवारचा सामना कळंगुट येथील पोरियट मैदानावर झाला. 

शापोराने सुरुवातीपासून जोरदार खेळ करत मध्यंतरापर्यंत दोन गोलांची आघाडी घेतली होती. सामनावीर फहीझ महम्मद याने १७व्या मिनिटाला पहिला गोल केला तर त्यानेच २५व्या मिनिटाला आपला दुसरा गोल नोंदविला. कांदोळीने पिछाडीवरून पुनरागमनाचा प्रयत्न करताना दुसर्या सत्रात ५९व्या मिनिटाला अनिकेत नाईककरवी पिछाडी कमी केली.

सेंट अँथनी एससी, असोल्डाने नावेली येथील रोझरी मैदानावर झालेल्या सामन्यात सारझोरा एससीचा ४-२ असा पराभव केला. विजेता संघ मध्यंतरापर्यंत २-० असा आघाडीवर होता. पहिले सत्र संपण्यापूर्वी सनी (१६वे मिनिट) व फेझर (३१वे मिनिट) यांनी सेंट अँथनीकडून गोल केले. दुसर्या सत्रात सारझोराने आपला खेळ सुधारला. त्यांच्या मायरन याने ४३व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. ५३व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी लाभली होती. पण, हेडन याला या संधीचा फायदा उठवता आला नाही. सारझोराने यानंतर दोन मिनिटांनी ऍस्टनद्वारे बरोबरीचा गोल केला. यानंतर निर्णायक गोलासाठी दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. यश मात्र सेंट अँथनीच्या वाट्याला आले. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हिक्टोरिनो फर्नांडिस याने त्यांचा तिसरा गोलकेला. अतिरिक्त वेळेच्या अंतिम क्षणांत ऍलरिचने चौथ्या गोलाची नोंद केली. ऍस्टन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

चिंचणी व्हेटरन्सने मित्रा व्हेटरन्सला २-० असे हरविले. कांदोळी येथील डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदानावर हा सामना झाला. विजयी संघाकडून निकिता सिल्वा लोबोने सातव्या मिनिटाला गोल केला. उरबान फर्नांडिसने ३०व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. मित्राचा नाविल अरावजो सामनावीर ठरला.