एकटेपणा..

जन्माला येताना आलो एकटाच आणि जाणारही एकटाच असे आपण कधी ना कधी तरी उद्वेगाने म्हणतो. पण आपले आयुष्य जगत असताना आपल्या कुटुंबाशी आपले भावनिक संबंध जुळलेले असल्याने आपल्याला एकमेकांशिवाय करमत नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ति जरी दूर गेली, तर आपल्याला जराही करमत नाही. असे असतानाही आपण पाहतो की काही व्यक्ति या आपल्या घरात एकाकी जीवन कंठत असतात.

Story: मर्मबंधातली ठेव | कविता प्रणीत आमोणकर |
20th May 2022, 10:23 pm
एकटेपणा..

कधी कधी कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा ताणतणावाच्या अधिक आहारी गेल्यामुळे म्हणा, मला सुद्धा एकांतात रहायला आवडायचे. पण एकांतात भयंकर पोकळी भरून राहिलेली असते, हे एकटेपणाचा काही काळ व्यतीत केल्यावर आपल्याला कळते. 

एकटेपणा आणि नैराश्य यांचा जवळचा संबंध आहे, असे म्हणतात. मनाला नैराश्यानं घेरलं की, एकटेपणातच आनंद वाटू लागतो. कोणाला कुणाच्या आठवणी सतावतात, तर कुणाला वेदना व्याकूळ करून जातात. असे दु:ख मग डोळ्यांतून अश्रूंच्या रूपाने पाझरत राहते. पण, मग याच वेदनांमध्ये गुंतून राहिले, तर मात्र जगणे अशक्य होते...

काही वेळेस महिलांच्या आयुष्यात एकटेपण अचानक येतं. जीवनाच्या जोडीदाराचा अचानक मृत्यू झाला, तर आलेले एकटेपण हे जीवन भकास करून सोडतं. अशा वेळी मन दगडासारखे घट्ट करून महिला एकाकी जीवनाला सामोऱ्या जाताना दिसतात. सोबतीला मुले, नातवंडे जरी असली, तरी जीवनाचा अर्धा अधिक काळ ज्याच्यासोबत घालवला, तोच जर अचानक निघून गेला, तर त्याच्या आठवणींसोबत राहणे ती अधिक पसंत करते. काही स्त्रिया याला अपवाद नक्कीच आहेत. जोडीदाराचा मृत्यू जरी झाला, तरी उर्वरित आयुष्य त्या आपली मुलं, सुना, नातवंडे यांच्यासोबत घालवणे पसंत करतात. 

परिस्थिती जर मनासारखी नसेल, तर काही महिला या एकाकी राहणे पसंत करतात. जर समजा एखादी मुलगी कुमारिका असेल, आणि तिचे जर तिच्या आईवडिलांशी पटत नसेल, घरातील भाऊ, वहिनी यांच्याशी तिला जुळवून घेणे शक्य नसेल, तर ती एकटी राहणे पसंत करते, अर्थात ती जर कमवती असेल, तरच. काही मुलींच्या लग्नाला सतत अडथळा येऊन त्या जर प्रौढ कुमारिका राहिल्या, तर अशा महिलांनाही समाजात प्रौढ कुमारिका बनून राहणे आवडत नाही. अशावेळी त्या आपल्या घरापासून दूर एखाद्या आश्रमात एकाकी राहणे पसंत करतात. 

प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटलंय की, माणसाचं मन हे मोठं विचित्र असतं. त्याला एकटेपण नकोसे असते. परंतु मनात जर माणसांची किंवा विचारांची गर्दी झाली की, मग ते एकटे राहणेच पसंत करू लागते. मग तो स्वत: एकांताच्या शोधात निघतो. गर्दीत जरी हरवायची भीती असली, तरी एकांतात मात्र स्वत:चा शोध घेणे जास्त सोपे असते. त्याप्रमाणे मनात विचारांची अथवा माणसांची गर्दी झालेल्या महिला एकाकी राहणे पसंत करतात. 

एकटेपण ही समस्या असली, तरी अशा परिस्थितीत राहणाऱ्या महिला या समस्येवर मात करताना दिसतात. स्वत:ला सतत एखाद्या चांगल्या कामात गुंतवून ठेवणे, समाजसेवा करणे, चांगल्या विषयांची पुस्तके वाचणे, नियमित योगसाधना करणे, धर्माचा प्रचार करणे, दिवसभर ठराविक दिनचर्येनुसार कामे करणे अशात त्या स्वत:ला सतत या ना त्या कारणाने गुंतवून ठेवतात.

 महिला जर एकट्या राहत असतील, तर त्यांनी सतत आपल्या मनाला चांगल्या विचारांचा सकस खुराक देणे गरजेचे आहे. कारण एकटेपणा हा एका प्रकारचा मानसिक रोग असून जर एकटेपणा बळावत गेला, तर मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसून, मनात आत्महत्येसारखे घातक विचार प्रबळ होत जातात.

एकटेपणाच्या नैराश्यातून या समस्या उद्भवत असल्याने एकट्या राहत असल्यांनी महिलांनी यावर मात करण्यासाठी समाजात, नातेवाइकांमध्ये अथवा आपल्या मैत्रिणींसोबत मिसळून आपल्या भावनांना वाट करून देणे गरजेचे आहे.