बनावट नोटा : आणखी चौघांना अटक

कारवार पोलिसांची मडगावात कारवाई : बनावट नोटा, कलर प्रिंटर, लॅपटॉप जप्त

|
19th May 2022, 11:53 Hrs
बनावट नोटा : आणखी चौघांना अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता

कारवार/ मडगाव : कारवार येथील बनावट नोटाप्रकरणातील मुख्य संशयित मुश्ताक हसन बेग (४३), याच्यासह अफजल हसन बेग (४५) यांना मडगावमधून अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या पत्नी अस्मा अफजल बेग व सीमा मुश्ताक बेग (४०) या एकाच कुटुंबातील चारजणांना कारवार पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बनावटनोटा, कलर प्रिंटर, लॅपटॉप व नोटाछापण्यासाठी वापरले जाणारे इतरसाहित्य जप्त करण्यात आल
अंकोला व कारवार पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवार शहर महामार्गावरील भद्रा हॉटेलसमोर ५ मे रोजी सायंकाळी छापा टाकत आंतरराज्य बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभाग असलेल्या चार संशयितांना अटक केली होती. या कारवाईत मडगाव येथील लॉएड लॉरेन्स स्टेविस (२९), प्रनॉय फर्नांडिस, फातोर्डा येथील लार्सन लेविस सिल्वा (२६) या संशयितासह कोडीबाग कारवार येथील प्रवीण नायर (४६) या संशयिताला कारवार शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. याप्रकरणातील मुख्य संशयित मुश्ताक हसन बेग (४३) हा पसार झालेला होता. त्यावेळी पोलिसांना ५०० रुपयांच्या २६ बनावट नोटा तर ५०० रुपयांच्या ४० खऱ्या नोटा त्यांच्याकडे आढळल्या होत्या. या कारवाईत संशयितांची एक स्कूटर, व एक जीपही कारवार पोलिसांनी जप्त केली होती. बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेले व्यापारी २० हजारांच्या खोट्या नोटांसाठी पाच हजारांच्या खऱ्या नोटा देतात, अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे. आता या प्रकरणातील मुख्य संशयित मुश्ताक हसन बेग पोलिसांच्या हाती लागलेला असल्याने या प्रकरणाचा गुंता सुटणार आहे.

संशयितांना मडगावातून अटक
कारवार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सुमना पेनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवार शहर पोलीस निरीक्षक श्रीधर एस. आर. होन्नावर पोलीस उपनिरीक्षक प्रेमनगौडा पाटील, अंकोला पोलीस अधिकारी भगवान गावकर, मंजुनाथ एल. संतोषकुमार आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली. मुख्य संशयितासह त्याला मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी मडगाव येथून ताब्यात घेत रितसर अटक केली.

संशयित एकाच कुटुंबातील
कारवार पोलीस पथकाने बनावट नोटाप्रकरणी कारवाई करत मुश्ताक हसन बेग, अफजल हसन बेग या दोन भावांसह मुश्ताक याची पत्नी सीमा मुश्ताक बेग व अफजल याची पत्नी अस्मा अफजल बेग या एकाच कुटुंबातील चार सदस्यांना अटक केली आहे. या प्रकरणात सध्यातरी बेग कुटुंबातील चार सदस्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. मात्र, पोलिसांकडून अन्य काहींचा समावेश आहे का याची चौकशी केली जात आहे.