फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी

|
19th May 2022, 11:57 Hrs
फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला एनआयए न्यायालयाने गुरुवारी दहशदवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणात दोषी ठरवले आहे. मलिकला किती शिक्षा होणार याचा युक्तिवाद २५ मेपासून न्यायालयात सुरू होणार आहे. मलिक याने स्वतःवरील सर्व आरोप मान्य केले आहेत. मलिकच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने एनआयएला दिले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला मलिकने आपल्यावरील सर्व आरोपांची कबुली दिली होती. यूएपीएसह त्याच्यावरील सर्व आरोप स्वीकारले. यामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग, काश्मीरमधील शांतता बिघडवणे, बेकायदेशीर कारवाया, गुन्हेगारी कट रचणे यांचा समावेश आहे.

मलिक यांनी न्यायालयाला सांगितले की, तो भारतीय दंड संहिता कलमाच्या यूएपीए (दहशतवादी क्रियाकलाप), १७ (दहशतवादी क्रियाकलापांसाठी निधी गोळा करणे), १८ (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि २० (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) साठी दोषी आहे. तो आयपीसीच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि १२४-ए (देशद्रोह) अंतर्गत त्याच्यावरील आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही. मलिक २०१९ पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.

यासिन मलिक हा फुटीरतावादी नेते आहे. तो जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) याच्याशी संबंधित आहे. काश्मीरच्या राजकारणात तो नेहमीच सक्रिय राहिला आहे. तिथल्या तरुणांना भडकवायला आणि हातात बंदूक घ्यायला त्याने नेहमीच प्रेरित केले आहे. २५ जानेवारी १९९० रोजी भारतीय हवाई दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपही मलिक याच्यावर आहे.