घरगुती गॅसचे गोवेकरांना चटके!

सिलिंडर आणखी ३.५० रुपयांनी महागला

|
19th May 2022, 11:56 Hrs
घरगुती गॅसचे गोवेकरांना चटके!

प्रतिनिधी । गोवन वार्ता       

पणजी : देशात महागाईची आग भडकत चालली आहे. राज्यात ७ मे रोजी घरगुती सिल‌िंडरच्या किमती हजाराच्या पुढे म्हणजे १,०१३.५० इतक्या झाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या बारा दिवसांत गुरुवारी त्यामध्ये आणखी ३ रुपये ५० पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे घरपोच सिलिंडर मिळण्यासाठी आता गोवेकरांना १ हजार १७ रुपये अशी मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडर ८ रुपयांनी महागला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या बजेटलाही धक्के बसू लागले आहेत. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल, डिझेल दरांची घोडदौड थांबली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरचे दर गोवेकरांना हळूहळू चटके देत आहेत. मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत दोन आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २,२५३ रुपये करण्यात आली होती. 

सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेशा आहेत.      

राज्यात जानेवारीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९१३.५० रुपये इतका होता. २२ मार्च रोजी त्यात ५० रुपयांची वाढ झाली होती. तेव्हापासून हा दर ९६३.५० रुपये इतका होता. दीड महिना उलटताच शनिवारी (७ मे) पुन्हा ५० रुपयांची वाढ झाल्याने हे तर १ हजार १३ रुपये ५० पैशांवर पोहोचले होते. आता बारा दिवसांनी त्यात आणखी ३.५० रुपयांची भर पडली आहे.

विधानसभा निवडणूक होईपर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर स्थिर राहिले होते. निवडणुकीचा निकाल लागताच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. प्रथम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत राहिले. त्याचबरोबर व्यावसायिक सिलिंडरच्या किमताही वाढत राहिल्या. आता घरगुती सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. याचा फटका आता सर्वांनाच बसू लागला आहे. दरम्यान, सरकारने नागरीपुरवठा खात्यामार्फत अनुदान देऊन दरवाढीचा भार हलका करावा, अशी मागणी होत आहे.