पाकचे चलनमूल्य प्रचंड घसरले

|
19th May 2022, 11:56 Hrs
पाकचे चलनमूल्य प्रचंड घसरले

कराची : श्रीलंकेच्या पाठोपाठ पाकिस्तानची अर्थव्यवस्था झपाट्याने दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २०० च्या आसपास पोहोचले आहे. गुरुवारी एक डॉलरसाठी २०० पाकिस्तानी रुपये मोजावे लागतील, असे मानले जात आहे. यासोबतच डॉलरचा काळाबाजारही झपाट्याने वाढला असून, तो रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने चैनीच्या आणि अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर कडक बंदी घातली आहे.

डॉलर दोनशे रुपयांच्या आसपास

‘फॉरेक्स असोसिएशन ऑफ पाकिस्तान’ (एफएपी) आणि ‘बिझनेस रेकॉर्डर पाकिस्तान’ यांनी बुधवारी रात्री जारी केलेल्या अहवालानुसार, बुधवारी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत १९९ वर पोहोचला. गुरुवारी ते २०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

११ एप्रिल रोजी शाहबाज शरीफ यांचे आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया १८२ रुपये होता. त्यानंतर त्यात झपाट्याने घट झाली आहे. अहवालानुसार, इम्रान सरकारने विदेशी कर्जाचे हप्तेही भरले नाहीत आणि नवीन सरकारसाठी ही मोठी समस्या आहे. याशिवाय श्रीमंत वर्ग डॉलर्सचा साठा करत आहे. त्यामुळे त्याचा काळाबाजार होत आहे. येथे एका डॉलरसाठी २६० पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात.