बेकारीमुळे फुटबॉलपटू बनला चोरटा!

साथीदारासह हिसकावायाचा सोनसाखळ्या; नाशिकमधून दोघेही गजाआड; जुने गोवे पोलिसांची कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th May 2022, 12:48 Hrs
बेकारीमुळे फुटबॉलपटू बनला चोरटा!

नाशिक येथून अटक केलेल्या संशयितांसह जुने गोवे स्थानकाचे पोलीस.

म्हापसा : राष्ट्रीय पातळीवर सामने खेळलेला एक फुटबॉलपटून करोनाच्या काळात ओढवलेल्या बेकारीने हतबल होऊन चोरीच्या मार्गाला लागल्याचे समोर आले आहे. मोनू सीताराम सिंग (२०, मूळ फातार्दी फाटा-नाशिक) असे या फुटबॉलपटूचे नाव असून जुने गोवे पोलिसांनी शुक्रवारी नाशिकमध्ये जाऊन साथिदारासह त्याला अटक केली आहे. गौतम उद्धव धापसे (१९, सिद्धार्थनगर-नाशिक) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. सोनसाखळ्या हसकावल्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात जुने गोवे पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावण्याचे दोन प्रकार घडले होते. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी या चोऱ्या केल्या होत्या. ५ मे रोजी वळवाडो-खोर्ली येथे ‘फर्नांडिस कॅटरिंग’ जवळ सोनसाखळी चोरीचा पहिला प्रकार घडला. त्या दिवशी सकाळी ११ वाजता एक महिला चालत जात होती. पांढर्‍या रंगाच्या स्कूटरवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ८० हजारांची १६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावली आणि पलायन केले.
दुसरा प्रकार जुने गोवे येथील दर्ग्याजवळ ९ मे रोजी दुपारी १२ वाजता घडला होता. रस्त्याने चालणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवली होती. या चोऱ्यांत संशयितांनी राखाडी रंगाच्या ‘ज्युपिटर स्कूटर’चा वापर केला होता. या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी भा.दं.वि. संहितेच्या ३५६ व ३७९ कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
ही चोरी कोणी केली, याबाबत पोलिसांनी शोध घेतला. जुने गोवे येथे राहणारे संबंधित संशयित हे नाशिक (महाराष्ट्र) येथे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक नाशिकला रवाना झाले व त्यांनी दोन्ही संशयितांना अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज धाऊसकर, कुणाल नाईक, कॉन्स्टेबल गीतेश गावस, दयेश खांडेपारकर, हरिश्चंद्र साखळकर, देवेश नारूलकर या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, संशयितांकडे अजून चोरीचे दागिने सापडले आहेत. अधिक चौकशीतून इतर काही चोरीच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

संशयित मोनू सिंग हा राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल सामने खेळलेला आहे. त्याने गोव्यातील एका नामंकीत संघातर्फे फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. करोनामुळे गेली दोन वर्षे बेकारीचा सामना करावा लागल्याने तो चोरीच्या प्रकरणांत गुंतला. चोरीसाठी तो आपल्या मित्राला सोबत घेऊन जात असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.