‘मेजर’ ट्रेलर प्रदर्शित


12th May 2022, 11:54 pm
‘मेजर’ ट्रेलर प्रदर्शित

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देशाच्या खऱ्या नायकावर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरमधील २६/११ चे भयानक चित्र चित्रपटाची कथा सांगण्यासाठी पुरेसे आहे. या ट्रेलरमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते मेजर बनण्यापर्यंत आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा सामना करण्यापर्यंतची झलक दिसते.
मेजर संदीप उन्नीकृष्णनची भूमिका अभिनेता आदिवी शेषाने केली आहे. ज्याद्वारे मेजर संदीपच्या पराक्रमाची गाथा पडद्यावर दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही बघू शकता की, मेजर संदीप यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची भावना होती आणि त्यांना नेहमीच सैन्यात भरती व्हायचे होते. मेजरच्या कथेत केवळ त्यांची देशाप्रती असलेली तळमळच नाही तर एका सैनिकाचे वैयक्तिक आयुष्यही दिसून येते.
सोनी पिक्चर फिल्म इंडिया या यूट्यूब चॅनलवर ट्रेलर रिलीज करण्यासोबतच सलमान खान आणि महेश बाबू यांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ट्रेलर तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मेजरचा ट्रेलर आधी २६ मार्चला रिलीज होणार होता, पण नंतर करोनामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.
मेजर चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का यांनी केले आहे आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला आदिवी शेष व्यतिरिक्त महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने एका प्रवासी भारतीय महिलेची भूमिका केली आहे जी त्या रात्री एका भयानक हल्ल्यात हॉटेलमध्ये दहशतवाद्यांना बळी पडते. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज या चित्रपटात मेजर संदीपच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.