रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगचे पहिलेवहिले जेतेपद बंगळुरूला


12th May 2022, 11:51 pm

पणजी : रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगचे (आरएफडीएल) पहिलेवहिले जेतेपद कोणाला मिळते याची सर्वांनाच उत्सुकता होती. बंगळुरू एफसी आणि केरळा ब्लास्टर्स एफसी हे या लीगमधील तगडे संघ जेतेपदाच्या लढतीत एकमेकांसमोर होते आणि सामनाही कट्टर झाला. गोलशून्य निकाल लागल्यामुळे बंगळुरू एफसीच्या नावावर आरएफडीएलचे जेतेपद झाले. आता हे दोन्ही संघ लंडन येथे होणाऱ्या ‘नेक्स्ट जेन कप’ स्पर्धेत खेळणार आहेत.  

बंगळुरूने पराभव टाळून जेतेपद नावावर केले. बंगळुरूने या लीगमध्ये सर्वाधिक १९ गुणांची कमाई केली, तर केरळाला १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हे हक्काचे व्यासपीठ दिल्याने मी रिलायन्सचे आभार मानतो. येथे प्रत्येक संघ तुल्यबळ होता. या स्पर्धेतून खेळाडूंना स्पर्धात्मक लीग काय असते, याची जाणीव होईल. प्रशिक्षकांसाठीही हा चांगला व्यासपीठ आहे, असे मत बंगळुरू एफसीचे प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, केरळा संघाचे मी अभिनंदन करू इच्छितो. त्यांचा संघही सर्वोत्तम आहे. या लीगमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या माझ्या खेळाडूंचा मला अभिमान वाटतो.

केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक टॉमस टीचॉर्झ म्हणाले, आम्ही चांगला खेळ केला आणि प्रतिस्पर्धींवर वर्चस्व गाजवताना गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. आमचा संघ सर्वोत्तम आहेच आणि आमचे खेळाडूही. बंगळुरूचा संघही चांगला आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळते.

या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी चेंडूवर ताबा राखण्याचा खेळ केला. केरळा ब्लास्टर्सचा महम्मद ऐमन हा गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु गोलरक्षक शॅरोन याने चांगला बचाव केला. बंगळुरूकडून दामैतफांग लिंगडोहने पहिल्या हाफमध्ये संधी निर्माण केली होती. मात्र, चेंडू क्रॉसबारवर आदळला. दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांकडून प्रयत्न झाले, परंतु कोणालाच यश आले नाही.

बंगळुरूचा स्ट्रायकर राहुल राजू याने लीगमध्ये सर्वाधिक ७ गोल केले आणि त्याला गोल्डन बूट  पुरस्कार मिळाला. मध्यरक्षक बेकेय ओरामला गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला. केरळाच्या सचिन सुरेशने गोल्डन ग्लोव्ह्ज पुरस्कार जिंकला.