साठ झोपड्या खाक : मुख्यमंत्री केजरीवालांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : दिल्लीतील गोकळपुरी येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत साठ झोपड्या खाक झाल्या, तर सात जणांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री आग आटोक्यात आणण्यात आली, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने शनिवारी दिली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ईशान्य) देवेश कुमार महला म्हणाले की, आगीची माहिती पहाटे १च्या सुमारास मिळाली. सर्व बचाव उपकरणांसह तात्काळ पथके घटनास्थळी पोहोचली. पहाटे ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणू शकलो.
आगीत साठ झोपड्या खाक झाल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. सकाळी ही बातमी ऐकली. मी घटनास्थळी जाऊन बाधित लोकांना वैयक्तिकरीत्या भेटेन, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.