भारतीय सिनेमाच्या संपन्न इतिहासाचे द्वार पुन्हा खुले

Story: राज्यरंग | नीलेश करंदीकर |
01st March 2022, 01:26 Hrs
भारतीय सिनेमाच्या संपन्न इतिहासाचे द्वार पुन्हा खुलेवास्तवभान देऊन साऱ्या जगाला एका सूत्रात गुंफणाऱ्या; मानवी नात्यांतील वीण अधिक घट्ट करणाऱ्या; पिचलेल्या जीवांना हळुवार ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अनुभूती देणाऱ्या सिनेसृष्टीचं आकर्षण नाही, असा माणूसच विरळ. भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठी उलाढाल करणारी इंडस्ट्री. त्याचे केंद्रही राहिले आहे ते मायानगरी मुंबई. १९३१ साली दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मुकपटाच्या निर्मितीनंतर हे क्षेत्र यशाची शिखरे पादाक्रांत करत गेलं. त्याचा समग्र, संपन्न इतिहास जतन करून ठेवलाय तो ‘नॅशनल म्युझियम आॅफ इंडियन सिनेमा’ने. करोना महामारीनंतर आता हे म्युझियम पुन्हा खुले झाले आहे. सिने अभ्यासकांसाठी ही सुखद बाब ठरावी!       

 दक्षिण मुंबईत 'गुलशन महल, २४, पेडर रोड, कुंबाला हिल’ येथे जानेवारी २०१९मध्ये पंंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली १५० कोटी रुपये खर्चून ते साकारण्यात आलेय. मात्र, करोना महामारीमुळे ते दोन वर्षे बंद होते. परिणामी चित्रपट इतिहासाचा वारसा सांगणारी ही इमारत अबोल झाली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांनी नुकतीच या संग्रहालयाला भेट ते खुले केले आहे.       

 दोन भव्य इमारतींमध्ये हे संग्रहालय आहे. एक गुलशन महल की, जी चित्रपटांचा वारसा सांगणारी देखणी इमारत आहे आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या एका अत्याधुनिक बहुमजली इमारतीत हे संग्रहालय आहे. गुलशन महलच्या आठ सभागृहांमध्ये हे संग्रहालय पसरले आहे. मूक चित्रपटापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातील चित्रपट असा प्रवास तेथे अनुभवायला मिळतो. तेथे अनेक संवादात्मक उपक्रम, प्रदर्शने आहेत. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी वापरलेल्या कित्येक दुर्मीळ वस्तूही तेथे पाहता येतात. ‘वीरपंड्या कट्टबोम्मन’ चित्रपटात अभिनेता शिवाजी गणेशन यांनी वापरलेले चिलखत, ‘आदीमई पेन्न’ चित्रपटात एम. जी. आर. यांनी वापरलेला लाल कोट देखील या संग्रहालयात बघायला मिळतो. चित्रपटात वापरल्या गेलेल्या वस्तू, जुनी उपकरणे, पोस्टर्स, महत्त्वाच्या चित्रफिती, जाहिरात करणारे बॅनर्स, साऊंड ट्रॅक, ट्रेलर्स, निगेटिव्ह, जुनी चित्रपट मासिके, चित्रपट निर्मिती आणि वितरणाची आर्थिक गणिते सांगणारी माहिती ही संग्रहालयात अत्यंत सुव्यवस्थितपणे मिळते. बालचित्रपट फिल्म स्टुडिओही आकर्षणाचे केंद्र ठरते. ​भारतीय सिनेक्षेत्राचा समृद्ध वारसा अभ्यासताना पुढच्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांचा संघर्ष, रचनात्मकता, विचार आणि कला जाणून घेण्यास ‘नॅशनल म्युझियम आॅफ इंडियन सिनेमा’ पर्वणी ठरते. म्युझियम प्रवेशासाठी अवघे २० रुपये मूल्य आकारले जाते. येत्या मे महिन्यात मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पट महोत्सव या जागी आयोजित करण्यात येत आहे. करोना महामारीनंतर आता नव्या पर्वात म्युझियम खुले झाल्याने त्याचा रसिकांना, अभ्यासकांना लाभ होईल, हे नक्की.