भाजपला बंडाचे ग्रहण!

सावित्रीनंतर उत्पलकडूनही राजीनामा; पार्सेकर, पाऊस्कर, फर्नांडिसही पक्ष सोडणार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:28 Hrs
भाजपला बंडाचे ग्रहण!

पणजी/पेडणे : भाजप उमेदवारी न मिळाल्याने बंड पुकारलेल्या नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत भाजपचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. सावित्री कवळेकर यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी शुक्रवारी राजीनामा देत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि माजी मंत्री दीपक प्रभु पाऊस्कर यांनीही अपक्ष लढण्याचे जाहीर केल्याने त्यांच्याकडूनही भाजपचा राजीनामा देण्यात येणार आहे.
भाजपने दोन दिवसांपूर्वी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पणजीतून उत्पल पर्रीकर, मांद्रेतून लक्ष्मीकांत पार्सेकर, सावर्डेतून दीपक पाऊस्कर, काणकोणमधून इजिदोर फर्नांडिस आणि सांगेतून उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर या इच्छुकांना वगळले. पक्षाच्या या निर्णयामुळे दुखावलेल्या पाचही जणांनी पक्षाविरोधात बंड पुकारून आपापल्या मतदारसंघांत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे गुरुवारी सर्वप्रथम सावित्री कवळेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. शुक्रवारी उत्पल पर्रीकरांनी राजीनामा सादर केला आहे. तर, शनिवारपासून उर्वरित तिघेही राजीनामा देण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपकडून आणखी सहा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. तेथेही इच्छुकांना संधी न मिळाल्यास ते पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, गोव्यासह संपूर्ण देशाचे लक्ष उत्पल पर्रीकर यांच्या निर्णयाकडे लागून होते. उत्पल यांनी शुक्रवारी सायंकाळी पणजीत पत्रकार परिषद घेत आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. आपले वडील तथा माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर अनेक वर्षे पणजीचे आमदार होते. पणजीसह गोव्याचा विकास आणि भाजपच्या जडणघडणीत आपल्या वडिलांचे मोठे योगदान आहे. त्यांनी लढवलेल्या मतदारसंघात भाजपने जो उमेदवार दिला आहे त्याचे नाव घ्यायलाही आपल्याला लाज वाटते. पक्षाने असा उमेदवार दिल्याने आपल्या वडिलांसोबत पक्षाचे काम केलेले पणजीतील कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यांच्यासाठीच आपण अपक्ष म्हणून पणजीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
मी आमदार होण्यासाठी किंवा मोठे पद मिळवण्यासाठी निवडणूक लढवत नाही. तर, मनोहर पर्रीकरांची तत्त्वे आणि मूल्ये जतन करण्यासाठीच निवडणुकीत उतरत आहे. भाजपने आपल्याला पणजी सोडून इतर दोन पर्याय दिले होते. ते आपल्याला नको होते. त्यानंतर भाजपने पणजीची उमेदवारी नाकारल्यानंतर इतर पक्षांनीही आपल्याला ऑफर दिल्या. पण, भाजप सोडून आपण इतर कोणत्याच पक्षाचा विचार करू शकत नाही,

लक्ष्मीकांत पार्सेकर आक्रमक

- माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही शुक्रवारी भाजप जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदासह भाजपचा राजीनामा देऊन मांद्रेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
- २०१७ च्या पोटनिवडणुकीत तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, आता आपले समर्थक, कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. गोव्यात भाजपचा विस्तार करण्यात माझे योगदान आहे. माझ्यासारख्या निष्ठावंतावर पक्षाने आणलेली परिस्थिती कार्यकर्ते, समर्थकांना मान्य नाही. त्यामुळेच त्यांनी केलेल्या मागणीनुसार पुढे जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याचे परिणाम भाजपला मांद्रे, पेडणेसह इतर मतदारसंघांतही जाणवतील, असेही पार्सेकर यांनी यावेळी नमूद केले.