अडवई, वांतेतील कृषी बागायती संकटात

पाण्याचा अभाव असल्याची ग्रामस्थांची तक्रार; मोर्चा काढण्याचा इशारा


21st January 2022, 11:52 pm
अडवई, वांतेतील कृषी बागायती संकटात

प्रतिनिधी। गोवन वार्ता                   

वाळपई : भिरोंडा   पंचायत क्षेत्रातील आडवई व वांते भागातील ५० एकर कृषी बागायतीला अजूनपर्यंत पाण्याची सुविधा उपलब्ध झालेले नसल्यामुळे या भागातील शेती बागायती पूर्णपणे करपलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला असून १५ दिवसांच्या आत पाण्याची समस्या पूर्वपदावर न आल्यास वाळपई जलसिंचन खात्यावर मोर्चा नेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.      

सध्या या भागात असलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू झालेली आहे. ही दुरुस्ती आताच करणे गरजेचे होते का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. बागायती करपल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे.       

जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात उपसा योजनेतील एका पंपात बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. दोन दिवसांत ही समस्या निकालात काढण्यात येणार असून पूर्ण स्वरुपात पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.      

या संदर्भात शेतकऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या योजनेअंतर्गत अडवई, वांते भागातील जवळपास २७ शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. अंदाजे ५० एकर जमीन ओलिताखाली आलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. यामुळे याचा वारंवार फटका बसतो. यंदा येथे असलेला बंधारा दुरुस्तीसाठी घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याची माहिती शेतकरी भीमराव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.   

जुनी मोटर पाणी कसे खेचणार? : भीमराव राणे      

भीमराव राणे यांनी सांगितले की, या योजनेमध्ये दोन मोटर उपलब्ध केलेल्या आहेत. मात्र त्या जवळपास तीस वर्षांपूर्वीच्या आहेत, यामुळे आवश्यक पाणी खेचत नाहीत. सदर मोटर बदलून नवे मोटर बसविण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली, मात्र त्याकडे दुर्लक्ष  करण्यात आलेले आहे. सध्या एकच मोटर कार्यान्वित आहे. यामुळे आवश्यक स्वरूपाचा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेती बागायतीवर व कृषी उत्पादनावर होत आहे.