पी. व्ही. सिंधू उपांत्यफेरीत दाखल


21st January 2022, 11:40 pm
पी. व्ही. सिंधू उपांत्यफेरीत दाखल

लखनऊ : पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ५०० स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. तिने थायलंडच्या सुपानिडा केथोंगचा ११-२१, २१-१२, २१-१७ असा पराभव केला. पुरुष विभागात भारताचा एच. एस. प्रणॉय पराभूत होऊन बाद झाला. त्याला फ्रान्सच्या अरनॉड मर्केलने १९-२१, १६-२१ असा पराभव केला. 

पाचव्या मानांकित प्रणॉयला उपांत्यपूर्व फेरीत ५९ मिनिटांच्या लढतीत फ्रेंच प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. मिथुन मंजुनाथने मात्र उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या सार्ज सिरांतचा ११-२१, २१-१२, २१-१८ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत मंजुनाथचा सामना मर्क्लेशी होईल.

सिंधूला तिच्या सामन्यात संघर्ष करावा लागला. पहिला गेम थायलंडच्या खेळाडूने जिंकला. पुन्हा एकदा इंडिया ओपनच्या आठवणी ताज्या झाल्या. गेल्या आठवड्यात इंडिया ओपनमध्ये सुपानिडा केथोंगने उपांत्य फेरीत सिंधूचा पराभव केला होता. मात्र सिंधूने यावेळी पुनरागमन करत थायलंडच्या खेळाडूच्या अपेक्षा भंग केल्या. 

सुमारे एक तास पाच मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिने विजय मिळवला. उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूचा सामना रशियाच्या इव्हगेनिया कोसेत्स्कायाशी होणार आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्ताकच्या तेरेजा स्वाबिकोवाचा २१-८, २१-१४ असा पराभव केला.

मालविका बनसोड आणि अनुपमा उपाध्याय यांच्यात महिला विभागाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत लढत होणार आहे. मालविकाने भारताच्या आकर्षी कश्यपचा २१-११, २१-११ असा पराभव केला.