‘टॉप फोर’मध्ये स्थानाचे चेन्नईयीन एफसीचे लक्ष्य


21st January 2022, 11:40 pm

मडगाव : आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगच्या ‘सॅटर्डे स्पेशल’ लढतीत (२२ जानेवारी) तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेडवर विजय मिळवून गुणतालिकेतील अव्वल चार क्लब्जमध्ये (टॉप फोर) स्थान मिळवण्याचे लक्ष्य चेन्नईयीन एफसीने ठेवले आहे.

ताज्या पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईयीननी ११ सामन्यांतून १५ गुणांसह सातवे स्थान राखले आहे. सहाव्या स्थानावरील एटीके मोहन बागान आणि त्यांचे गुण समसमान असले तरी सरस गोलफरकावर मोहन बागानने वरचे स्थान राखले आहे. काही क्लबमधील फुटबॉलपटुंना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने एटीकेचे तीन सामने पुढे ढकलण्यात आले.

आणखी एक विजय माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला थेट अव्वल चार संघांमध्ये पटकावण्याची संधी आहे. आठव्या हंगामात त्यांची कामगिरी संमिश्र आहे. ४ सामन्यांत विजय मिळवताना त्यांनी तितकेच सामने बरोबरीत सोडवलेत. तीन सामने ड्रॉ ठरलेत. चेन्नईयीनचा बचाव थोडा चांगला आहे. आक्रमण ठिक आहे. कर्णधार अनिरुद्ध थापाचे त्यात मोलाचे योगदान आहे. त्याने दहा गोल करण्यात (असिस्ट) मदत केली आहे. गोल असिस्ट करण्यादृष्टीने थापा याच्यासाठी हा सर्वोत्तम गोल ठरला आहे.

चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक बॉझिडार बँडोविक यांच्या मते, मध्यफळीने खेळ उंचावल्यास अधिकाधिक संधींचे गोलांमध्ये रूपांतर होऊ शकेल. आक्रमणासह आम्हाला निर्णय क्षमतेत सुधारणा करण्याची गरज आहे. भविष्यातील मजबूत आणि चांगला संघ बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक सामना आम्ही गांभीर्याने घेतो. शनिवारचा नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्धचा सामनाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे बँडोविक म्हणाले.

नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लबला डझनभर सामने खेळून केवळ ३ सामने जिंकता आलेत. त्यांची पराभवांची संख्या ७ इतकी आहे. मागील पाच सामन्यांत ते विनलेस आहेत. त्यात तीन पराभव आणि दोन बरोबरीचा समावेश आहे. मागील लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेडला ओडिशा एफसीकडून ०-२ अशी मात खावी लागली. खालीद जमील यांच्या प्रशिक्षकपदाखालील नॉर्थ ईस्ट युनायटेडला सर्वच आघाड्यांवर अपयश आले आहे. बचावफळी पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. त्यांनी १२ सामन्यांत २५ गोल खाल्लेत.