भगवंत मान ः कॉमेडियन ते मुख्यमंत्रिपदाचे आपचे उमेदवार

पंजाब


21st January 2022, 11:25 pm
भगवंत मान ः कॉमेडियन ते मुख्यमंत्रिपदाचे आपचे उमेदवार

देशातल्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी दणक्यात सुरु झालीय. या पाचपैकी पंजाब वगळता इतर चारही राज्यांमधे भाजप सत्ताधारी बाकावर आहे. देश ढवळून काढणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबवर नक्की कुणाचा झेंडा फडकतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पंजाबच्या सत्तेसाठी सगळेच प्रमुख पक्ष आता आपापली रणनीती जाहीर करू लागलेत. अशातच, ‘आप’ने मुख्यमंत्रिपदासाठी खासदार भगवंत मान यांचं नाव पुढे केलंय. मान हे ‘आप’चे पंजाबमधले एकमेव खासदार आहेत. २०१७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या ‘आप’ने मान यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली होती. पण दहा वर्षं सत्तेत असलेल्या रालोआकडून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत सगळ्याच राजकीय पक्षांचे मनसुबे उधळून लावले. ‘आप’ला त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

भारतात इंटरनेट बाळसं धरत होतं त्यावेळी बहुतांश पंजाबी शेतकरी ‘कुल्फी गर्मा गर्म’चा आस्वाद घेण्यात मग्न असायचे. भल्या पहाटे शेताची वाट धरणाऱ्या बळीराजासाठी ‘कुल्फी गर्मा गर्म’च्या कॅसेटी मनोरंजनाचा मोठा आधार होत्या. ‘कुल्फी गर्मा गर्म’ हा भगवंत मान यांचा सुपरडुपर हिट अल्बम होता. राजकीय परिस्थितीला शेलके चिमटे काढत हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचं त्यांचं हे कसब अल्पावधीतच लोकप्रिय झालं. ‘कुल्फी गर्मा गर्म’ हा मान यांचा काही पहिलाच अल्बम नव्हता. बऱ्याचशा युवा महोत्सव आणि आंतर-कॉलेज स्पर्धांमधे त्यांनी आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली होती. ‘गोबी दिये कच्चिये वपार्ने’ या त्यांच्या पहिल्या अल्बमचंही लोकांनी स्वागतच केलं होतं. आपल्या अल्बममधून राजकारणावर टीका करण्याबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांनाही वाचा फोडली जात होती. पुढे ते ‘जुगनू केंदा है’सारख्या विनोदी मालिकांमधे झळकले आणि ‘जुगनू’ या नावाने घरोघरी पोचले. टीवी मालिकांमधे तसेच वेगवेगळ्या सिनेमांमधे झळकल्यानंतर २०११मधे मान ‘पीपल पार्टी पंजाब’ या शिरोमणी अकाली दलातून बाहेर पडलेल्या गटात सहभागी झाले. पुढच्याच वर्षी त्यांना लेहरा विधानसभेत पराभूत व्हावं लागलं. २०१४ला त्यांनी ‘आप’मधे प्रवेश करत संगरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. संगरुरच्या जनतेने प्रचंड मताधिक्याने त्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ घातली.

२०१७मधे पंजाब ‘आप’च्या प्रदेशाध्यक्षपदी मान यांची वर्णी लागली. त्यातच २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला सत्ता मिळवून देण्याची सूत्रंही मान यांच्या हातात सोपवली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या माजी प्रदेशाध्यक्ष गुरप्रीत घुग्गी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर घुग्गींनी मान यांच्या दारू पिण्याच्या सवयीवरून रान उठवलं. मान यांची ही सवयच विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा ठरली. त्यामुळे निवडणुकीत ‘आप’च्या पदरी निराशाच आली.

गावोगावच्या मतदारांची नस ओळखून असलेल्या भगवंत मान यांना उमेदवारी देऊन ‘आप’ने मोठी खेळी खेळलीय. युवकांमधे, विशेषतः ग्रामीण भागात मान बरेच लोकप्रिय आहेत. नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनाचा फार मोठा प्रभाव या विधानसभा निवडणुकीवर असणार आहे. मान यांचा संगरुर हा मतदारसंघ शेतीमालाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. या भागातला प्रमुख मतदार हा शेतकरी आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात मान यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या पथ्यावर पडू शकते. 

(कोलाज.ईन संकेतस्थळावरून)