भाजपकडून कुणालाही बाहेरून पाठिंबा नाही : तानावडे

सदानंद शेट तानावडे : उर्वरित जागांसाठी उमेदवारांची घोषणा पुढील चार दिवसांत


21st January 2022, 12:46 am
भाजपकडून कुणालाही बाहेरून पाठिंबा नाही : तानावडे



प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : आलेक्स रेजिनाल्ड यांनी कुडतरीतून अपक्ष निवडणूक लढणार, असे स्पष्ट केले आहे. त्याआधी रेजिनाल्डनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत त्यांना बाहेरून पाठिंबा द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपकडून त्यांना नकार देण्यात आला. भाजप सर्व मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. राज्यातील ३४ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित ६ जागांवरील उमेदवार पुढील चार ते पाच दिवसांत जाहीर करण्यात येतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
नावेली येथील भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर यांच्या प्रचाराला शुभारंभ करताना प्रदेशाध्यक्ष तानावडे उपस्थित राहिले होते. यावेळी तानावडे यांनी सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा भाजप पक्ष असल्याने कुणालाही बाहेरून पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. तानावडे म्हणाले, यावेळी भाजपकडून पहिल्यांदाच राज्यातील सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावेलीत याआधी अपक्षांना पाठिंबा दिला जात होता. यावेळी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जात आहे. गोवा प्रभारींनी सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला असून केंद्रीय निवडणूक समितीसमोर सादर केला होता. केवळ आम्ही नाव पुढे केले म्हणजे एखाद्याला तिकीट जाहीर होत नाही. पक्ष सर्व बाबींवर विचार केला जातो व केंद्रीय निवडणूक समितीकडून निर्णय घेण्यात येतो, असे तानावडे म्हणाले.
राज्यात दोन ठिकाणी भाजपकडून पती व पत्नी अशा दोघांनाही तिकीट हे तेथील परिस्थितीचा विचार करून देण्यात आले आहे. पर्ये मतदारसंघात प्रतापसिंग राणे हे एकही निवडणूक न हरता गेली ५० वर्षे निवडून येत आहेत. प्रतापसिंग राणे यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाले असतानाही त्यांनी यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार नसल्याचे स्वखुशी जाहीर केल्यानंतर त्यांची सून दिव्या राणे यांना भाजपने तिकीट दिले आहे. भाजपने गेल्यावेळी पर्येत तिकीट दिलेल्या उमेदवाराने आपमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही ठिकाणी सर्व बाबींचा विचार करून केंद्रीय समितीने हा निर्णय घेतलेला असल्याचे ते म्हणाले.
उत्पल पर्रीकरांवर बोलणे टाळले
उत्पल पर्रीकर यांच्या विषयाबाबत बोलणार नाही. तो विषय गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस हे हाताळत असून त्यांनी या विषयावर मत व्यक्त केले आहे. त्यावर भाष्य करून त्या विषयाला वेगळे वळण देणार नाही, असे सांगत तानावडे यांनी उत्पलबाबत बोलणे टाळले.