काँग्रेसने थिवीत माझा वापर केला!

उदय साळकर : समर्थकांसह ‘आप’मध्ये प्रवेश


20th January 2022, 11:26 pm
काँग्रेसने थिवीत माझा वापर केला!

उदय साळकर यांना पक्षात प्रवेश देताना आतिशी. सोबत अॅड. अमित पालेकर.

पणजी : काँग्रेसने थिवी मतदारसंघात राजकीय फायदा घेण्यासाठी माझा वापर केला. दोन वर्षांपूर्वी म्हापसा येथे काँग्रेस कुठेच दिसत नव्हती. मी काँग्रेससाठी खूप काम केले आणि त्यांनी माझा विश्वासघात केला, अशी खंत यावेळी उदय साळकर यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या थिवी गटाचे नेते उदय साळकर यांनी समर्थकांसह गुरुवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या आमदार आतिशी, पणजीचे उमेदवार वाल्मिकी नाईक आणि आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अॅड. अमित पालेकर यावेळी उपस्थिती होते. प्रवेश केल्यानंतर साळकर यांनी वरील विधान केले. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या सहा वर्षांत दिल्लीच्या शैक्षणिक आणि आरोग्य पायाभूत सुविधांचा कायापालट केला आहे. या विकासानेच मी प्रभावीत झालो, असेही ते यावेळी म्हणाले.

उद्योजक उदय साळकर हे कोकणी चित्रपटसृष्टीतील कामासाठी प्रसिद्ध आहेत. ते लोकप्रिय नाट्यकलाकार आहेत. आपने राज्यात बदल घडवून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच कारणाने ते व त्यांचे समर्थक यांनी पक्षात प्रवेश केला आहे, अशी माहिती अॅड पालेकर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

निवडणुकीच्या तोंडावर इतर सर्व राजकीय पक्ष युतीसाठी चर्चा करण्यात व्यस्त आहेत. उलट आपने आपले ३१ उमेदवार, गोव्याचा व्हिजन प्लॅन आणि गोवेकरांनी समर्थन दिलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणून घोषित केला आहे. याच कारणाने आम आदमी पक्षाला गोवेकरांडून मोठा पाठिंबा मिळत आहे, असे वाल्मिकी नाईक यावेळी म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचे मॉडेल गोव्यासाठी लाभदायक आहे. मोफत वीज, पाणी, चांगले रस्ते आणि रोजगाराच्या संधी गोव्यातील लोकांना हव्या आहेत. आपच्या मुख्यमंत्री चेहऱ्याच्या घोषणेने राज्यात सकारात्मकतेची लाट पसरली आहे. येत्या काही दिवसांत अनेक लोक आपमध्ये सामील होतील, असा दावा यावेळी आमदार आतिशी यांनी केला.