सरकारी नोकरीसाठी युवकांचा व्यर्थ आटापिटा

जो विद्यार्थी पूर्ण वर्ष पुस्तकातील धडे शिकतो आणि त्याच धड्यातील प्रश्न परीक्षेला येतात, त्यावेळी त्याला चांगले गुण मिळवता येत नाहीत; आणि सरकारी नोकर भरतीच्या परीक्षेत कोणते प्रश्न येथील याची जाणीव नसताना देखील चांगले गुण मिळवणे कसे सोपे जाते?

Story: विचारचक्र। ज्ञानेश्वर वरक |
20th January 2022, 11:11 pm
सरकारी नोकरीसाठी युवकांचा व्यर्थ आटापिटा

काही दिवसांपूर्वी सरकारी नोकर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती काढण्यात आल्या होत्या. गोव्यातील प्रत्येक युवकाला आज वाटत आहे की आपणास सरकारी नोकरी मिळावी. आणि जवळपास सर्व युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले होते. काहींचे नशीब उगवले तर काहीजण अजूनही प्रतीक्षेत. या आटापिट्यातून खूप काही अनुभवायला मात्र मिळाले. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी दर वेळी सांगतात की आपण स्वतःच्या मतदारसंघातील युवकांना नोकर्‍या मिळवून दिल्या. आणि ही तर शर्यतच चालली आहे की कुणी किती नोकऱ्या दिल्या. हे विचार करण्यासारखा आहे आमदार नोकर्‍या कशा काय देऊ शकतात? आणि जर आमदार नोकऱ्या देतात तर परीक्षा कशासाठी ठेवल्या आहेत? जर नोकऱ्या गुणवंत यादीप्रमाणे मिळतात तर पूर्ण श्रेय आमदारांना कशाला. सुशिक्षित माणसाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्रता आमदार ठरवत असेल तर त्याच्या शिक्षणाचा उपयोग काय. एखाद्या आमदाराकडे जे खाते असते, त्या खात्यातील नोकरीसाठीच्या परीक्षेत त्याच्याच मतदारसंघातील युवक गुणवंत असतात हे कसे काय शक्य आहे? यात काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट मात्र नक्कीच आहे. आमदाराकडे खाते असले की त्या खात्यातील परीक्षेत गुणवंत गुंण मिळवण्यासाठी युवक कमी वेळात इतके हुशार बनतात तरी कसे? जर त्यांचे शिक्षणातले दहावीपर्यंतचे गुण बघितले तर त्यांची हुशारी आपणास नक्की जाणवेल. आणि जर खाते आमदाराजवळ असले की युवक हुशार बनतात तर शिक्षण संस्था सुरू करण्याऐवजी खात्यांची बदली करावी, जेणेकरून सर्व मतदारसंघातील युवक लवकर हुशार बनतील. ज्या मुलाला दहावीत ३३ टक्के गुण असतात, त्यांनाच सरकारी नोकर भरती परीक्षेत ९९ गुण कसे मिळतात? जो विद्यार्थी पूर्ण वर्ष पुस्तकातील धडे शिकतो आणि त्याच धड्यातील प्रश्न परीक्षेला येतात त्यावेळी त्याला चांगले गुण मिळवता येत नाहीत आणि सरकारी नोकर भरतीच्या परीक्षेत कोणते प्रश्न येथील याची जाणीव नसताना देखील चांगले गुण मिळवणे कसे सोपे जाते.

जी मुलं एवढी हुशार आहेत आणि त्यांना चांगले गुण मिळवता येतात तर ते लिपिक आणि मल्टिटास्किंग कर्मचारी का बनतात? त्यांनी चांगले शिकून डॉक्टर किंवा यूपीएससी परीक्षा पास होऊन उच्च स्तरावरील नोकर भरतीत सामील व्हायला हवे होते. त्यांना उच्च स्थान मिळेल, जास्त सन्मान मिळेल, देशासाठी काम करण्याची संधी मिळेल आणि गोव्यातील युवक उच्च स्तरावर सरकारी कर्मचारी असावे अशी प्रत्येक गोमंतकीयांची इच्छा त्यांच्या वतीने पूर्ण तरी होईल. कारण जे युवक हुशार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळायलाच हवी. दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार एखाद्या परीक्षेत पास होतो आणि पदवीधर उमेदवार पास होऊ शकत नाही हे कसं शक्य आहे. यामागे काय लपले आहे, चूक नक्की कुठे आहे, शिक्षणात की सरकारी नोकर भरतीसाठीच्या परीक्षेत? जर याचे उत्तर मिळाले नाही तर कष्ट करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल. याचा फटका सुशिक्षित उमेदवारांना बसत आहे आणि त्यांच्या बुद्धीचा वापर करण्याची संधी त्यांच्याकडून कोणतरी हिरावून घेत आहे. जर पदवीधर बेरोजगार हिंडत असेल आणि त्याच्याच बरोबर परीक्षा देणारा दहावी पास असलेला उमेदवार सरकारी नोकरी साठी पात्रता ठरत असेल तर त्या पदवीचा उपयोग तरी काय. जर ज्ञानाचा योग्य तो वापर होत नसेल तर ते ज्ञान मिळवून काहीही उपयोग नाही. सरकारी नोकरीसाठी निवडलेला उमेदवार जर योग्य नसेल तर याचा फटका समाजाला नक्कीच बसेल.

जो माणूस आमदारांच्या मागे फिरतो त्यांना सरकारी नोकरी अशी चर्चा आता जनतेमध्ये रंगत आहे. मंत्री स्वतःच्या तोंडाने सांगतात की आपण नोकऱ्या देतो, मग शिक्षणाला काय मान शिल्लक आहे. मंत्री देखील एकामेकावर नोकऱ्या विकल्याचे आरोप करतात हे सत्य आहेत की नाही याला पुरावे मिळेपर्यंत समजणार नाही. पण हे कितपत सत्य आहे ती जनतेला मात्र नक्कीच माहित आहे. नोकर भरतीला स्थगिती असल्याने आता लोकांमध्ये चांगली चर्चा सुरू आहे. आपण एवढे पैसे मोजले तेवढे पैसे मोजले सर्व सत्य आता बाहेर सरत आहे. आणि युवक एवढे गुणवंत कसे असतात यामागचा मार्ग आता सर्वांना कळाला आहे. जर एखाद्या उमेदवाराला खालच्या पदाच्या परीक्षेत कमी गुण मिळतात त्याच उमेदवाराला वरच्या पदाच्या परीक्षेत पूर्ण गुण मिळतात हे कसे शक्य आहे ते आता जनतेमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून नक्कीच जाणवते. नोकरी मिळवण्यासाठी हुशारी हून अधिक महत्वाचे पैसे असतील तर तो माणूस राज्याचा चांगला विचार कसा करू शकेल आणि भ्रष्टाचार कमी कसा होणार. जर उमेदवार पात्रता नसताना त्याला एखादे पद मिळाले तर त्याचा मान तो कधीच राखू शकत नाही. शेवटी जनतेच्या पदरी मात्र निराशा राहील.

किती दिवस असे लाचार बनवून नोकरीसाठी भीक मागणार? कुणावर तरी अन्याय करून, ज्ञानाला महत्व न देता पैशाच्या जोरावर नोकरी मिळवणे कदापि योग्य नाही. जर देशाला उच्च स्तरावर जागा मिळायला हवी तर योग्य ते ज्ञान असलेला माणूस योग्य पदावर असणे गरजेचे आहे. नाही तर देशाचे भले होणार नाही. जास्त मेहनत करून शिकणाऱ्याला पहिली संधी मिळायलाच हवी, कारण तो त्याचा हक्क आहे. जर शिक्षणाला योग्य तो वाव मिळत नसेल तर कोणाचाही शिक्षणावर विश्वास राहणार नाही. सुशिक्षित माणसाने सरकारी नोकरीची वाट पाहत बसणे योग्य नाही, मिळेल ती संधी स्वीकारणे काळाची गरज आहे. फक्त सरकारी नोकरीच करणारे जीवन जगतात असे नाही, प्रत्येकाला जगण्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात. सरकारी नोकरीसाठीच्या आटापिटा सोडून देणेच योग्य.