आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताची आयर्लंडवर मात


20th January 2022, 09:31 pm
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताची आयर्लंडवर मात

त्रिनिदाद : १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ च्या ‘ब’ गटातील सामन्यात भारताने आयर्लंडचा १७४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय अंडर-१९ संघाने ३०८ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. टीम इंडियाच्या अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंग यांनी शानदार खेळी केली आहे. तर गरव सांगवान, अनिश्‍वर गौतम आणि कौशल तांबे यांनी २-२ गडी बाद केले.
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतासाठी आंगक्रिश आणि हरनूर सलामीला आले. आंगक्रिशने ७९ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. तर हरनूरने १०१ चेंडूत ८८ धावा केल्या.
या दोघांशिवाय राज बावाने ४२ धावा (६४ चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार) आणि सामन्याचे नेतृत्व करणाऱ्या निशांत सिंधूने ३४ चेंडूत पाच चौकारांसह ३६ धावांचे योगदान दिले. शेवटी राजवर्धन हंगरगेकर याने चमत्कार केला. त्याने १७ चेंडूंत पाच षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३९ धावांची खेळी करत भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला. अशाप्रकारे भारताने ५० षटकांत ५ विकेट गमावून ३०७ धावा केल्या.
टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेला आयर्लंडचा संघ १३३ धावांत सर्वबाद झाला. आयर्लंडकडून या सामन्यात स्कॉट मॅकबेथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ३२ धावा केल्या. भारताकडून अनिश्वर गौतमने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ११ धावा देत २ बळी घेतले. गरवने ५ षटकांत २३ धावा देत २ बळी घेतले. कौशलनेही दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक :
भारत : ५० षटकांत ५ बाद ३०७ धावा.
आयर्लंड : ३९ षटकांत सर्वबाद १३३ धावा.