सांताक्रूझमध्ये छापा; १.७ लाखांची दारू जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th January 2022, 10:21 Hrs
सांताक्रूझमध्ये छापा; १.७ लाखांची दारू जप्त

जप्त केलेल्या दारूसाठ्यासोबत पोलीस पथक.

पणजी : जुने गोवा पोलिसांनी बुधवारी दुपारी सेंट आगुस्तिन-सांताक्रूझ परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला १ लाख ७ हजार६४२ रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. हा माल नंतर अबकारी खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सेंट आगुस्तिन-सांताक्रूझ येथील आंतोनियो फर्नांडिस याच्या घरात बेकायदेशीररीत्या दारू साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुने गोवा पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी दुपारी १.३०ते २ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. या पथकामध्ये उपनिरीक्षक विराज धाऊस्कर,कुणाल नाईक,हवालदार समीर फडते, कॉन्स्टेबल गीतेश गावस, अनिकेत देवीदास, देवेश नारुलकर व इतर कर्मचारी सहभागी होते. या छाप्यात १ लाख ७ हजार ६४२ रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा मिळून ५४९ लीटर दारूचा साठा बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. पोलिसांनी रीतसर पंचनामा करून साठा जप्त केला व नंतर अबकारी खात्याकडे सुपूर्द केला.