अग्रलेख । महाराजजी

निष्ठा, साधना, मेहनत यामुळे त्यांनी कथ्थकाला उंची दिलीच, शिवाय कथ्थकाला सर्वदूर पोहचवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी विकसित केलेले नृत्य सर्वांनीच स्वीकारले हे विशेष.

Story: अग्रलेख |
19th January 2022, 01:01 am
अग्रलेख । महाराजजी

वेगवेगळ्या कलांचा अविष्कार आणि भारतभूमीवरील नृत्याचा अवतार बिरजू महाराज यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी एक्झीट घेतली. त्यांच्या जाण्यामुळे देशाच्या आणि जगाच्या नृत्यकलेचे विशेषतः कलाक्षेत्राचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. बिरजू महाराज म्हणजे कथ्थक. नृत्यातून कथा खुलवून सांगणारे बिरजू महाराज यांनी कथ्थकाला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांनी कथ्थकाचे रूप बदलले. आधुनिकतेची जोडही त्यांनी कथ्थकला दिली. या देशाच्या या महान सुपुत्राच्या जाण्यामुळे संपूर्ण कला क्षेत्राची हानी झाली आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी नृत्याचे धडे द्यायला सुरूवात केली. कालांतराने ते ब्रिजमोहन मिश्राचे बिरजू झाले आणि नंतर बिरजू महाराज किंवा त्यांच्या जवळच्यांसाठी महाराजजी झाले. निष्ठा, साधना, मेहनत यामुळे त्यांनी कथ्थकाला उंची दिलीच शिवाय कथ्थकाला सर्वदूर पोहचवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी विकसित केलेले नृत्य सर्वांनीच स्वीकारले हे विशेष.फक्त नृत्यात निपूण नव्हे तर गायकीतही ते माहीर होते. तबला, पखावज, सितार, वायोलीन, बासरी, ढोलकी अशा अनेक वाद्यांना ते सहजतेने हाताळत. अनेक कलांचे मिश्रण असलेल्या पंडित बिरजू महाराज यांनी कथ्थक म्हणजे बिरजू महाराज ही ओळखच तयार केली. नृत्यकार, गायक, कवी, चित्रकार, वादक अशा अनेक रुपांमध्ये महाराज जगले. असे हे जादुई कलावंत म्हणजे कथ्थक सम्राट होते. लखनऊमधील कथक घराण्यात त्यांचा जन्म. वडील अच्छन महाराज हे रायगढच्या राजघराण्यातील दरबारी नर्तक. जन्मजात नृत्याचा वारसा. वडिलांचे निधन झाल्यानंतर काका लच्छू महाराज आणि शम्भू महाराज यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. लच्छू महाराज आणि शम्भू महाराज अर्थाथ शम्भूनाथ मिश्र ही देशाच्या कथ्थक क्षेत्रातील महान नावे. त्यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. तिथे वयाच्या तेराव्या वर्षी बृजमोहन मिश्र यांनी नृत्याचे प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीला संगीत भारती संस्थेत, नंतर भारतीय कला केंद्र त्यानंतर संगीत नाटक अकादमीच्या कथ्थक केंद्रांत प्रशिक्षण दिले.1998 मध्ये निवृत्तीनंतर दिल्लीत कलाश्रम नावाने नाट्य विद्यालय उघडले. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्य दिग्दर्शन केल्यामुळे त्यांची ख्याती सिनेमा रसिकांमध्येही पोहचली. अगदी लहान वयात त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरूवात केल्यानंतर बिरजू महाराज हे नाव नृत्य क्षेत्रात गाजू लागले. कमी वयातच त्यांना 1964 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९८३ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. कालिदास सन्मान, लता मंगेशकर पुरस्कार, फिल्मफेअर, भरत मुनी सन्मान, नृत्य चुडामणी अशा पुरस्कारांसह इंदिरा कला संगीत विद्यापीठाने मानद डॉक्टरेट दिली. बनारसच्या हिंदू विद्यापीठानेही त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली होती. आंध्र रत्न, नृत्य विलास पुरस्कार, आधारशिला शिखर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू अवार्ड, राष्ट्रीय नृत्य शिरोमणी पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार असे कितीतरी प्रतिष्ठीत पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. विश्वरुपम चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीतला उत्कृष्ठ नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. शतरंज के खिलाडी, उमराव जान, देवदास, बाजीराव मस्तानी, विश्वरुपम, देढ इश्किया अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांचे योगदान आहे. त्यांचे नृत्य दिग्दर्शन लाजवाब असायचे. बिरजू महाराजांनी तयार केलेला शिष्यवर्ग प्रचंड मोठा आहे. चित्रपटांपासून ते देशात आणि जगभर त्यांचे शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी नृत्य सादर करतात, शिकवतात. कथ्थक प्रशिक्षण देऊन त्यांनी नृत्यावर श्रद्धा असलेला एक सांप्रदायच तयार केला. बिरजू महाराजांनी कथ्थकमध्ये अनेक नवे प्रयोग केले. असे म्हणतात की लहानपणी त्यांचे नाव दुखहरण ठेवले होते. पण नंतर ते ब्रिजमोहन करण्यात आले. अर्थात श्रीकृष्णांचे हे नाव. योगायोगाने कथ्थकचा संदर्भही कृष्णाकडे लावण्यात येतो. आपल्या नृत्याने, कथ्थकाच्या रुपातून, नाविन्यपूर्ण प्रयोग, कथ्थकासाठीचे घेतलेले अथक परीश्रम यातून त्यांनी अनेकांना दुखहरण करण्याचाच जणू मंत्र दिला. कथ्थकातील अभ्यासपूर्ण जाण आणि बारकावे माहीत असल्यामुळे त्यांचा कथ्थक नृत्यावर प्रभाव राहिला. तो कायम राहील. नृत्याच्या या अवताराला भावपूर्ण श्रद्धांजली.