सिडबॉल

Story: असे उपक्रम अशी शाळा । संकेत सुरेश नाईक |
16th January 2022, 12:49 am
सिडबॉल

एक  एक  झाड लावू ममतेनं,  

आम्ही फुलवू हे  रान  सारे हिमतीनं, 

रोज  देऊ  पाणी आम्ही करू  निगरानी, 

जगूया झाडांच्या संगतीनं. 

या ओळींना आपण स्वर व तालबध्द करून पर्यावरणदिनी वा एखाद्या पर्यावरणीय कार्यक्रमाचे आयोजन करून सदर गाणे सादर करतो आणि आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये रंगतदारपणा आणतो. काव्याच्या बोलांप्रमाणे आपण जर वृक्षारोपण केले तर आमच्या पृथ्वीचे पुनर्वसन होण्यासाठी वेळ  लागणार नाही. 

सध्याच्या कोविड महामारीच्या या काळात झाडांचे महत्त्व सर्वांना कळून चुकले आहे. ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना देवाज्ञा झालेली आपण पाहत आहोत. ऑक्सिजन निर्माण करणारी एकमेव फॅक्टरी म्हणजे तरू. या तरुंचे जंगलात रुपांतर होणे आता काळाची गरज आहे. सदर वृक्षसंवर्धनासाठी एकमेकांच्या सहाय्यानेच पर्यावरण संवर्धनासाठी व जागतिक तापमानवाढ, कार्बन उत्सर्जनावर मात करण्यासाठी खारीचा वाटा पुनर्वसन साळ येथील सरकारी प्राथमिक शाळेने “सिडबॉल” नावाचा अनोखा असा उपक्रम कोविड १९ च्या काळात राबविला. तोच उपक्रम पाच वर्षांअगोदर आंबेशी-पाळी येथील प्राथमिक शाळेने आयोजित केला होता. 

सिडबॉल, बीजगोळे, सिडबॉम या सारख्या नावाने परिचित असलेली वस्तू बनविण्यासाठी माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण करून, त्यात पाणी घालून पीठासारखे मळून त्याचे छोटे-छोटे गोळे करावे. त्या गोळ्यांमध्ये देशी झाडांच्या बिया घालाव्यात, त्याला हाताने बॉलसारखा आकार दिल्यावर काही वेळातच सीडबॉल तयार. हे सीडबॉल्स कोवळ्या उन्हात वाळवावेत. एक सिडबॉल तयार करण्यासाठी लहान मुलांना अर्धा ते एक मिनिट लागते. घरातील इतर सदस्यांची मदत घेऊन  ताशीच्या अंदाजाप्रमाणे  १००  सिडबॉल आपण  सहज  करू शकतो.  

सिडबॉलच का?  हा प्रश्न तुमच्या डोक्यात उड्या मारत असेल तर   ......नुसत्या बिया बाहेर टाकल्या तर त्या पक्षी, किटक, इतर प्राणी खाऊ शकतात.  किंवा पहिल्याच पावसाळ्याच्या सरीमुळे वाहून जाण्याची दाट शक्यता असते. सिडबाॅल करून फेकले तर पावसाच्या पाण्याच्या धारेबरोबर ते जमिनीवर चिकटतात.  सिडबाॅलमध्ये शेणखत असल्याकारणाने त्या बियांना लगेच अंकुर येतो.  

पावसाळा तोंडावर येण्यापूर्वीचे दिवस हाच सीडबॉल्स बनवण्यासाठी उत्तम काळ. हा काळ म्हणजे रानमेव्याचा काळ आणि बियाही भरपूर उपलब्ध. घरी आणलेल्या फळांच्या बियाही तुम्ही व्यवस्थित वाळवून यासाठी उपयोगात आणू शकता. एकदा का पाऊस सुरू झाला की तुमचं पुढचं काम सुरू होईल. एक दोन मोठे पाऊस झाले की हे सीडबॉल्स घेऊन घराबाहेर पडा. एखादी योग्य मोकळी जागा दिसली किंवा तुम्ही ती आधीच हेरून ठेवली तरी चालेल, हे गोळे या मोकळ्या जागेवर फेका. म्हणजे आपण थ्रो करतो तसे फेकले तरी चालतील. पावसाळी सहलीद्वारे आपण सदर सिडबाॅल मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेल्या ठिकाणी फेकू शकतो.

सिडबॉलद्वारे आपण देशी झाडामध्ये पळस ( लाल , पिवळा ) , कदंब, खैर, अर्जुन,  कांचनार,  बकूळ, शिरस, पांगारा, काटेसावर, धामण, हिरडा, बेहडा, सीता अशोक, ताम्हण, करमळ, बिब्बा, आपटा, चारोळी, बाभूळ, बोर,  जांभूळ, रिठा, बकूळ, बेल,  चिंच,  करंज,  खैर,  कुंकूफळ,  कोकम,  शिकेकाई, कुसुम्ब,  कुंभ,  कडुलिंब ,  काळा कुडा , पांढरा कुडा ....  आदी  झाडांचे नकळतच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संवर्धन व संरक्षण करून पर्यावरणदिनांत नवचैतन्य आणू  शकतो. 

सर्वात मोठा सिडबॉल म्हणजे आपली पृथ्वी आहे. कारण पृथ्वीच्या गर्भात अनेक प्रकारच्या बिया असतात त्या अंकुररूपी बाहेर निघून त्याचे महाकाय वृक्ष बनतात. वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.  पुनर्वसन साळ शाळेतर्फे राबविण्यात आलेला सिडबॉल उपक्रम म्हणजे निसर्गाचे पुनर्वसन करण्यासारखेच कार्य  आहे असे  म्हटले  तर  वागवे  ठरणार नाही.  

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण विविध शैक्षणिक संस्था वा इतर निम सरकारी संस्थातर्फे   वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबवत असतो. पण  वृक्षारोपण करणे प्राथमिक विद्यालयातील मुलांसाठी त्रासदायक काम असते त्याऐवजी  विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण न करता बीजगोळे अर्थात सीडबॉल तयार करून घेतले तर शाळेतर्फे राबविण्यात आलेला उपक्रम नकळच स्तुत्य होऊन जातो. सहज आपल्या मुखातून  "वृक्षवल्ली आम्हा सोयरी...." या ओळी उमटतात.