कन्याकुमारी-एक प्रेरणा स्थान

स्वामी विवेकानंदानी ध्यानधारणा केलेल्या कन्याकुमारी शहराच्या शब्दरूपी आठवणी .

Story: ललित | सुप्रिया केतकर |
14th January 2022, 11:12 Hrs
कन्याकुमारी-एक प्रेरणा स्थान

कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदानी ध्यानधारणा केली व अद्भुत दैवी शक्ती प्राप्त केली.   तिथून त्यांनी जगभर हिंदू धर्माचा प्रचार सुरू करून जागतिक स्तरावर हिंदू धर्माला मानाचे स्थान मिळवून दिले. त्या शहराबद्दलच्या माझ्या काही आठवणी सांगण्याचा हा प्रयत्न.  तारीख ५/२/२०२०. मी व माझी बहीण (अक्का) पहिल्यांदाच स्वामी विवेकानंदाचे स्मारक पहायला कन्याकुमारीला गेलो होतो. कन्याकुमारी शहर हे भारताच्या दक्षिण सीमेच्या टोकावर जिथे  तीन सागरांचाही संगम होतो तिथे वसलेले आहे. पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र तर दक्षिणेला हिंद महासागर आहे. स्वामींचे समाधी स्मारक संगमाच्या एका बेटावर, तर त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला देवी कन्याकुमारीचे देऊळ आहे. दुसऱ्या बेटावर थीरूवळळूवर ह्या तमिळ कवीचा पुतळा आहे. तिथे गेल्यावर समुद्रातून वाहणारे जोराचे वारे अंगावर शहारे आणतात व मन एकदम उल्हासित होते. प्रत्येक रचना एवढी भावते कि त्यात काहीतरी गूढ लपलंय त्याचा शोध घ्यावा असे वाटू लागते. असे म्हणतात की, जास्त खोलात जाऊ नये पण मला जावे असे वाटले.  

प्राचीन काळी आसेतु हिमाचल या प्रचंड देशाला भरतवर्ष असे नाव होते. एक महापराक्रमी भरत नावाचा सम्राट होऊन गेला. त्याचेच नाव या देशाला दिले गेले. या भरत राजाला आठ पुत्र व एक कन्या होती. या कन्येचे नाव “कुमारी” होते. भारताचे नऊ भाग करून भरत राजाने  अपत्यांना वाटून दिले. त्यात कुमारी नाडू हया प्रांताचा राज्यकारभार कन्या “कुमारी” बघत होती. या पवित्र क्षेत्री परमेश्वराची परा शक्ती कन्यारूपाने तपश्चर्या करीत आहे. तिच्या उजव्या हस्तकमलात जपमाला आहे. तिची कथा मी तिथेच विक्रीस ठेवलेल्या पुस्तकातून वाचली व मन खिन्न झाले. 

प्रसंग -कन्याकुमारीचा विवाह 

तिच्या विवाहपूर्वी नारदाने बाणासूराचा वध, तसेच लग्नासाठी घातलेल्या तीन शक्य नसलेल्या अटी, तरीसुद्धा त्या अटी पूर्ण करण्यास भगवान शंकर उशिरा पोचल्या कारणाने, कन्याकुमारीने प्रतीक्षेत सोडलेला प्राण हे सर्वच जाणून घेताना हृदय चिरून जाते. तेव्हा  अस्थाव्यस्थ सांडलेले अन्न, अक्षदा आता  समुद्रकाठी असलेल्या वाळूत रंगीत वाळूच्या रूपात आपल्याला दिसून येतात. देवीचे दर्शन महिला लाल साडी नेसून घेतात. ह्या देवीचे देऊळ भार्गव परशुरामने  बांधले व नंतर अनेक राजांनी त्यात ब-याच सुधारणा केल्या. चोळस, चेरास, पंड्या व  नाईकस हे  तिथले राज्यकर्ते होते.  

कन्याकुमारीहून श्रीलंका ही अवघ्या २०० कि.मी.अंतरावर वसलेली आहे. रामयण काळात  समुद्रातले कोरल्स वापरुन बांधलेला रामसेतूचा जवळजवळ १०० कि. मी भाग पूर्ण  पाण्याखाली बुडलेला आहे, तर थोडा भाग ढोपराएवढया पाण्यात बुडलेला आहे. 

कन्याकुमारी हे कला व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे बऱ्याच प्रकारच्या  मसाल्यांचा व नैसर्गिक दगडापासून तयार केलेल्या माळांचा व्यापार चालतो. केरळ व श्रीलंकेतून हया गोष्टी मागवल्या  जातात. कन्याकुमारी हे शहर व्यापार व दळणवळणासाठी प्रसिद्ध आहे.

श्री. एकनाथजी रानडे हया महान व्यक्तीने सन १९६३ साली पुढाकार घेऊन व बऱ्याच अडचणींवर मात करून भर समुद्रात हे विवेकानंद भव्य स्मारक ब-याच लोकांच्या सहकार्याने बांधले. हे स्मारक माझ्या स्मृतीपटलावर कायमचे स्मरणीय ठरले.