पद्मश्री मारिया आरोरा कुटो यांचे निधन

|
14th January 2022, 11:16 Hrs
पद्मश्री मारिया आरोरा कुटो यांचे निधन

नावेली/पणजी : सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिक, लेखिका आणि शिक्षण तज्ज्ञ पद्मश्री मारिया आरोरा कुटो (८६) यांचे शुक्रवारी सकाळी ११.३० वा. गोमेकॉ इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले. त्या मूळच्या हळदोणा येथील रहिवासी होत्या. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र विवेक कुटो यांनी दिली. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आदींनी दुःख व्यक्त केले आहे.सर्दीचा त्रास व्हायला लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन पुत्र व कन्या असा परिवार असून गोवा सरकारचे माजी सल्लागार ख्रि. आल्बन कुटो यांच्या त्या पत्नी होत.
धारवाड येथे त्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण झाले होते. नंतर मिरामार येथील धेंपे महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयावर अध्यापन केले. दिल्लीच्या श्रीराम महाविद्यालयातही त्यांनी ज्ञानदानाचे काम केले आहे. गोवा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तेथेही ज्ञानदानाचे कार्य केले.

शिक्षण, संस्कृती आणि वारसा क्षेत्रांत मारिया यांचा काम सदैव स्मरणात राहील.
- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

गोव्याच्या भविष्याविषयी मारिया यांना नेहमी काळजी होती. साहित्य तसेच समाजासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो

१९६० च्या सुमारास मारिया यांनी धेंपे महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य केले आहे. त्यांना मनापासून श्रद्धांजली.
- प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहासतज्ज्ञ

गोव्याच्या संस्कृतीचे प्रेम हृदयात बाळगून सदैव गोव्यासाठी कार्य करणार्‍या मारिया या नेहमीच प्रेरणास्थान राहतील. त्यांच्या निस्सीम कार्याला आमचा मानाचा सलाम.
- अन्वेषा सिंगबाळ, अध्यक्ष, कोकणी भाषा मंडळ