आमदार अपात्रता याचिकेवर १९ रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January 2022, 11:26 Hrs
आमदार अपात्रता याचिकेवर १९ रोजी सुनावणी

पणजी : मगोच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात सुदिन ढवळीकर यांनी तर काँग्रेसच्या दहा बंडखोर आमदारांविरोधात गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी ठेवली आहे.             मगोच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात ढवळीकर यांनी तर काँग्रेसच्या दहा बंडखोरांविरोधात चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अपात्रता याचिका दाखल केली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी निधन झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांना १९ मार्च २०१९ रोजी मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर २६ मार्च २०१९ रोजी मध्यरात्री आमदार मनोहर आजगावकर आणि मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर या दोघांनी मगोतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, मंत्री जेनिफर मोन्सेरात, आमदार बाबुश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा या दहा जणांनी १० जुलै २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आमदार ढवळीकर यांनी मगोच्या बंडखोर आमदारांविरोधात तर चोडणकर यांनी काँग्रेसच्या दहा बंडखोर आमदारांविरोधात सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. या प्रकरणी २० एप्रिल २०२१ रोजी सभापती राजेश पाटणेकर यांनी दोन्ही अपात्रता याचिका फेटाळून लावल्या. या निवाड्याला ढवळीकर आणि चोडणकर यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे.       

मागील सुनावणीवेळी खंडपीठाच्या न्या. साधना जाधव आणि न्या. रेवती मोहित डेरे या द्विसदस्यीय खंडपीठाने संबंधित याचिका निर्देशासाठी बुधवारी ठेवली होती. मात्र यावेळी दोन्ही याचिकांची सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर दुपारच्या सत्रात काँग्रेसतर्फे वकील अभिजीत गोसावी यांनी याचिकेची सुनावणीबाबत खंडपीठाच्या नजरेस आणून दिला. त्यानंतर खंडपीठाने याचिकेची सुनावणी १९ रोजी ठेवली आहे.