कला सादर करताना होरपळलेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January 2022, 11:22 pm
कला सादर करताना होरपळलेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

वाळपई : केरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘रेमको’ हा कला प्रकार सादर करताना ज्येष्ठ महिला कलाकाराच्या अंगाला आग लागल्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशी की, केरी येथे पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्ये येथील पार्वती महादेव सावंत या ७० वर्षीय महिला कलाकाराने ‘रेमको’ हा विशिष्ट कलाप्रकार सादर केला होता. यावेळी त्यांनी आपल्या सर्वांगाला सुके गवत बांधले होते. हा कलाप्रकार सादर करत असताना अचानकपणे त्यांच्या अंगावरील गवताला आग लागली व त्यात त्या जखमी झाल्या होत्या. जखमी अवस्थेत त्यांना १०८ रुग्णसेवा वाहनातून गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे कलाकार क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पार्वती सावंत या हरहुन्नरी ज्येष्ठ कलाकार होत्या. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी ‘रेमको’ हा विशेष कला प्रकार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या कलांचे संवर्धन व रक्षण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा मृत्यू झाला, हे खरोखरच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, अशा प्रकारे लोककलाकार विशिष्ट लोककलांचे संवर्धन व रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत असतात. मात्र सरकारकडून अशा कलाकारांना सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे धोरण राबविलेले नाही. पार्वती सावंत या लोककलाकाराच्या निधनामुळे कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कला व संस्कृती खात्याने ही घटना अत्यंत गंभीरतेने घेऊन येणाऱ्या काळात लोककलाकारांसाठी विशिष्ट योजना लागू करून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा