भाजप-काँग्रेसमधील अप्रत्यक्ष युती उघड : पालेकर


08th December 2021, 08:12 am
भाजप-काँग्रेसमधील अप्रत्यक्ष युती उघड : पालेकर

पत्रकार परिषदेत बोलताना अमित पालेकर. सोबत मान्यवर.


पणजी :  काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप आणि काँग्रेसमधील अप्रत्यक्ष आणि न पाहिलेली युती आता लपून राहिलेली नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी
केली.
भाजपने गोव्याची निवडणूक जिंकणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेससोबत सेटिंग केल्यानंतर पक्षाने मिळवलेल्या आत्मविश्वासाचे मी कौतुक करतो. तत्पूर्वी ज्या हॉटेलमधून बाहेर पडताना अलेक्स रेजिनाल्ड यांना कॅमेरामनने टिपले त्या ठिकाणी भाजपची बैठक सुरू होती. भाजप-काँग्रेसचा ताळमेळ मतदानाच्या सेटिंगसाठी ओळखला जातो. मात्र, यावेळी त्यांचे रहस्य समोर आले, असे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालेकर म्हणाले.
भाजप पक्ष नाव बदलण्यात चांगला आहे. पक्षाने आपले नाव भारतीय जनता पार्टी बदलून भारतीय काँग्रेस पार्टी केले पाहिजे. भाजप सरकारने यापूर्वीच काँग्रेसच्या १० नेत्यांना पक्षात घेतले आहे. नाईकांनंतर कामत लवकरच सामील होतील आणि राज्यात काँग्रेसचा एकही नेता उरणार नाही असेही ते म्हणाले.
सध्या दोन्ही राष्ट्रीय पक्ष एका महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे राजकारण करण्यात व्यग्र आहेत. अलीकडेच काँग्रेसने भाजपचा एक मंत्री सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्याचे आरोप केले आहेत. त्या राजकारण्यावर कारवाई करण्याऐवजी दोन्ही राष्ट्रीय पक्ष राजकारण खेळण्यात व्यग्र आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीने त्या स्त्रीसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असेही पालेकर
म्हणाले.
या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्या मंत्र्याचे नाव जाहीर न केल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी हे कारस्थान असल्याच पालेकर म्हणाले. त्यामुळे गिरीश यांना पोलिसांनी बोलावून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पालेकर यांनी केली.