ममता ‘आयर्न लेडी’ : फ्रान्सिस्को फर्नांडिस

काशिनाथ मयेकर, नॅटी पो यांचा तृणमूलमध्ये प्रवेश


08th December 2021, 08:11 am
ममता ‘आयर्न लेडी’ :  फ्रान्सिस्को फर्नांडिस

ममता ‘आयर्न लेडी’ :  फ्रान्सिस्को फर्नांडिस    
काशिनाथ मयेकर, नॅटी पो यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
प्रतिनिधी । गोवन वार्ता      
पणजी : अखिल गोवा पंचायत परिषद अध्यक्ष फ्रान्सिस्को फर्नांडिस, काँग्रेसचे माजी नेते काशिनाथ मयेकर, समाजवादी पक्षाच्या माजी नेत्या नॅटी पो यांच्यासह इतर दोघांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.      
अखिल गोवा पंचायत परिषद अध्यक्ष आणि शिवोलीचे पंच फ्रान्सिस्को फर्नांडिस, काँग्रेसचे मये येथील माजी नेते काशिनाथ मयेकर, समाजवादी पक्षाच्या माजी नेत्या नॅटी पो, शिवोली सड्येचे माजी उपसरपंच दशरथ दाभोळकर आणि ऍडव्होकेट प्रकाश गोवेकर यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये नेते किरण कांदोळकर आणि शिवदास नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.        
ममता बॅनर्जी या ‘आयर्न लेडी’ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन कार्य केले जाते. या उलट काँग्रेसमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना गृहीत धरले जाते, अशी टीका फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी केली आणि काँग्रेस व गोवा फॉर्वर्डच्या युतीला ‘अभद्र युती’ असे संबोधले.       
ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालमधील कार्य पाहून भारावून गेल्याचे काशिनाथ मयेकर यांनी सांगितले. सगळ्या विरोधी शक्ती एकवटल्यानंतरही ममतादीदींना हरवू शकल्या नाहीत, असेही मयेकर पुढे म्हणाले.      
भाजपने गोव्याच्या लोकांचा भ्रमनिरास केला आहे. गोवेकरांना हितकारक असलेल्या योजना बंद केल्या. त्यामुळे, गोवेकरांना बदल हवा आहे. गोवेकर भरवसा ठेवतील असा पर्याय निवडणे आवश्यक आहे, असे मत नॅटी पो यांनी व्यक्त केले.       
इतर पक्षांनी उपेक्षित ठेवलेल्या तळागाळातील या कार्यकर्त्यांमुळे आणि त्यांच्या समर्पित कार्यामुळेच तृणमूल काँग्रेस गोव्यात सत्तेवर येईल. एक नवी पहाट उजाडेल, असे मत किरण कांदोळकर यांनी व्यक्त केले.