‘सोपटे टॅक्स’चा आज पर्दाफाश

मुदत संपताच लैंगिक अत्याचार प्रकरणही चव्हाट्यावर : गिरीश चोडणकर यांचा इशारा


08th December 2021, 08:06 am
‘सोपटे टॅक्स’चा आज पर्दाफाश


गोवा फॉरवर्डचे माजी संयुक्त सचिव जॉन नाझारेथ यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर. सोबत मान्यवर.


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १५ दिवसांचा कालावधी दिला होता. या कालावधीत कारवाई न झाल्यास आपण पुढील पावले उचलणार आहोत. तसेच मांद्रेतील ‘सोपटे टॅक्स’चा बुधवारी पर्दाफाश करणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला.
मंगळवारी पणजीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारातील मंत्र्यावर आपण केलेले सेक्स स्कँडलचे आरोप खरे आहेत. त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. याशिवाय आपण केलेले आरोप सत्य असल्याचे भाजपचेच आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आपल्याला आव्हान देणार्‍या भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यातील सत्यता आमदार कार्लुस आल्मेदा आणि हे प्रकरण दडपू पाहत असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून जाणून घ्यावी, असे आवाहन चोडणकर यांनी केले.
मांद्रे मतदारसंघांतील विविध कामांत ‘सोपटे टॅक्स’ घेण्यात येत असल्याचा आरोप आपण केला होता. आपल्या आरोपांना स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण, सोपटेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांना आपल्यावर आरोपबाजी करण्यास भाग पाडले. मांद्रेतील अनेक कामांवेळी आमदार सोपटे यांना कशाप्रकारे टॅक्स द्यावा लागतो, याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. ते पुरावे आपण बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर उघड करणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

जॉन नाझारेथ काँग्रेसमध्ये
गोवा फॉरवर्डचे माजी संयुक्त सचिव तथा अखिल गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे स्वागत केले. नाझारेथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचार्‍यांचे प्रश्न, समस्या  सोडवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल, अशी हमी चोडणकर यांनी यावेळी
दिली.


रवी काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखेच होते!
- मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिलेले रवी नाईक काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखेच होते. त्यांची दोन्ही मुले भाजपमध्ये गेल्यापासून ते काँग्रेसपासून दूर होते. त्यामुळे, पक्षाने फोंड्यात नवे नेतृत्व तयार करण्यावर भर दिलेला होता, असे गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.
- विधानसभा निवडणुकीसाठी फोंड्याच्या उमेदवारीसाठी फोंडा गट काँग्रेस समिती तसेच दक्षिण गोवा जिल्हा समितीने जी नावे सादर केलेली होती, त्यात रवी नाईक यांचे नावही नव्हते. यावरूनच स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यावर किती नाराज होते हे लक्षात येते, असेही चोडणकर यांनी नमूद केले.